अमराठी रिक्षाचालकांचा बंद; ‘मी मराठी’ अभियानातून मनसे आक्रमक
अमराठी रिक्षाचालकांचा बंद; ‘मी मराठी’ अभियानातून मनसे आक्रमक
अमराठी रिक्षाचालकांनी पुकारलेल्या बंदच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आक्रमक झाली असून ‘मी मराठी’ अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या माध्यमातून मराठी भाषिक रिक्षाचालकांना समर्थन देत प्रवाशांना विशिष्ट रिक्षांची निवड करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
या अभियानांतर्गत मराठी बोलणाऱ्या आणि मराठीत संवाद साधणाऱ्या रिक्षाचालकांच्या रिक्षांवर “मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, या माझ्या रिक्षात बसा” असे फलक लावले जात आहेत. त्यामुळे प्रवाशांना मराठी भाषिक चालक सहज ओळखता येणार असून, त्यांच्याच रिक्षेतून प्रवास करण्याचा संदेश दिला जात आहे.
यासंदर्भात बोलताना मनसे नेते संदीप देशपांडे यांनी रिक्षाचालकांच्या बंदवर टीका करत म्हटले की, “अमराठी आहे, मला मराठी येत नाही, मी बोलणार नाही असे म्हणणाऱ्या रिक्षाचालकांचा माज उतरवण्याची हीच वेळ आहे.” तसेच, ज्या रिक्षांवर ‘मी मराठी’ स्टिकर लावलेले आहे, त्याच रिक्षांमध्ये प्रवास करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
या घडामोडींमुळे अमरावतीतील रिक्षा व्यवसायात भाषिक अस्मिता आणि स्थानिक राजकारणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मनसेच्या या अभियानामुळे पुढील काळात रिक्षा व्यवसायात मराठी भाषेला प्राधान्य मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
— प्रतिनिधी, उमेश कुलकर्णी, पुणे
