पिंपरी-चिंचवडमध्ये १३ वर्षांच्या मुलाकडून रिक्षा चालवली; व्हिडिओ व्हायरल होताच आरटीओ ॲक्शन मोडमध्ये
पिंपरी-चिंचवडमध्ये १३ वर्षांच्या मुलाकडून रिक्षा चालवली; व्हिडिओ व्हायरल होताच आरटीओ ॲक्शन मोडमध्ये
पिंपरी-चिंचवड (वाकड):
पिंपरी-चिंचवड शहरात वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वाकड परिसरातील गजबजलेल्या रस्त्यावर अवघ्या १३ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने रिक्षा चालवत प्रवाशांच्या जीवाशी खेळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक अल्पवयीन मुलगा बेधडकपणे मुख्य रस्त्यावर रिक्षा चालवत असल्याचे स्पष्ट दिसते. विशेष म्हणजे, रिक्षामध्ये बसलेली प्रौढ व्यक्ती त्याला थांबवण्याऐवजी या प्रकाराचे चित्रीकरण करताना दिसत आहे. या निष्काळजीपणावर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
घटनेची गंभीर दखल घेत पिंपरी-चिंचवड आरटीओने तातडीने तपास सुरू केला आहे. व्हिडिओतील रिक्षाच्या क्रमांकावरून मालकाचा शोध घेण्यात येत असून, अल्पवयीन मुलाला वाहन चालवू देणे हा गंभीर गुन्हा मानला जात आहे. संबंधित रिक्षा मालकाचा परवाना रद्द करणे, तसेच दंडात्मक कारवाई करण्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, अशा बेजबाबदार कृत्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून स्वतःचा आणि इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या प्रवृत्तींवर लगाम लावण्यासाठी प्रशासनाने ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9722548429