फॉर्म 121’चा गोंधळ; “बँकेत पैसे ठेवायचे का?” असा नागरिकांचा सवा
‘फॉर्म 121’चा गोंधळ; “बँकेत पैसे ठेवायचे का?” असा नागरिकांचा सवा
पुणे, २४ एप्रिल २०२६:
टॅक्स वाचवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या फॉर्म प्रक्रियेत मोठा गोंधळ निर्माण झाला असून, “फॉर्म 121” या नव्या फॉर्मच्या अंमलबजावणीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. यापूर्वी वापरल्या जाणाऱ्या Form 15G आणि Form 15H यांच्या ऐवजी हा नवीन फॉर्म आला आहे
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, या “फॉर्म 121”मध्ये अनेक विसंगती असून, अकाउंट नंबर किंवा FD नंबरसाठी अधिकृत कॉलम नसतानाही बँक कर्मचारी हे तपशील जबरदस्तीने भरायला लावत आहेत. जर ही माहिती आवश्यक असेल, तर ती फॉर्ममध्ये स्पष्टपणे का नमूद नाही, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
तसेच, या फॉर्ममध्ये मागील दोन वर्षांच्या इन्कम टॅक्स रिटर्नचे तपशील भरण्याची सक्ती केली जात आहे. याशिवाय, करदात्यांनी जुनी (Old Regime) की नवी (New Regime) करप्रणाली वापरली याबाबतही विचारणा केली जात आहे. त्यामुळे फॉर्म प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनली आहे.
दरम्यान, सर्व आर्थिक व्यवहारांची नोंद आयकर विभागाकडे Form 26AS मध्ये उपलब्ध असताना, प्रत्येक बँकेत स्वतंत्रपणे इतकी सविस्तर माहिती मागण्याची गरज काय, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
विशेषतः सरकारी बँकांमध्ये या संदर्भात योग्य मार्गदर्शन मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. अनेक ठिकाणी बँक कर्मचाऱ्यांनाही या नवीन फॉर्मबाबत स्पष्ट माहिती नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी, ग्राहकांना वारंवार बँकांचे फेरे मारावे लागत असून, मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
या सर्व त्रासामुळे “बँकेत पैसे ठेवायचे का नाही?” असा गंभीर प्रश्न आता नागरिकांसमोर उभा राहिला आहे.
नागरिकांना आवाहन
या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी या विषयाबाबत Ministry of Finance कडे तक्रार नोंदवावी, तसेच बँकांकडून अनावश्यक माहितीची मागणी होत असल्यास त्याविरोधात आवाज उठवावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
तज्ज्ञांच्या मते, फॉर्म प्रक्रियेत एकसमानता आणि स्पष्टता नसल्यास नागरिकांचा बँकिंग व करप्रणालीवरील विश्वास कमी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करणे अत्यावश्यक ठरत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
