आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय* मिरज महापालिकेत २४ वर्षांचा गुंठेवारी डेटा गायब; प्रशासनात खळबळ:-
*आंधळं दळतंय आणि कुत्रं पीठ खातंय*
मिरज महापालिकेत २४ वर्षांचा गुंठेवारी डेटा गायब; प्रशासनात खळबळ:-
जि. सांगली.ता. (मिरज):दि. 25 एप्रिल 2026:-
शहरातील महापालिकेच्या नगररचना विभागात मोठी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. गुंठेवारी नियमितीकरणाशी संबंधित तब्बल २४ वर्षांचा महत्त्वाचा संगणकीय डेटा अचानक गायब झाल्याने प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे. या गंभीर प्रकारामुळे अनेक प्रकरणांवर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हरवलेल्या डेटाचा शोध घेण्यासाठी अधिकाऱ्यांची धावपळ सुरू असून, तांत्रिक पातळीवर तपास सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणात निष्काळजीपणा झाल्याचा ठपका ठेवत संबंधित एका लिपिकास शिस्तभंगाची नोटीस बजावण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाला आम आदमी पार्टीच्या तक्रारीमुळे वाचा फुटली. पक्षाने गुंठेवारीचा डेटा ‘करप्ट’ झाल्याचा आरोप करत प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर विभागीय चौकशीत ही धक्कादायक बाब समोर आली.
नगररचना विभागाचे प्रभारी सहाय्यक संचालक हणमंत मारनूर यांनी स्पष्ट केले की, संबंधित लिपिकाची बदली झाल्यानंतर ऑनलाइन माहितीचे योग्य हस्तांतरण करण्यात आले नव्हते. याच निष्काळजीपणामुळे हा डेटा गायब झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांच्या प्रलंबित गुंठेवारी प्रकरणांवर परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. डेटा पुनर्प्राप्त करण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू असून, दोषींवर कडक कारवाई होणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.
