सोलर ग्राहकांना सरकारचा ‘शॉक’; ३० हजार ग्राहकांवर वीज कराची टांगती तलवार
सोलर ग्राहकांना सरकारचा ‘शॉक’; ३० हजार ग्राहकांवर वीज कराची टांगती तलवार
छत्रपती संभाजीनगर, २४ एप्रिल २०२६:
सौर ऊर्जेचा वापर करणाऱ्या नागरिकांसाठी एक चिंताजनक घडामोड समोर आली आहे. सरकारकडून आता सोलर रूफटॉप वापरणाऱ्या ग्राहकांकडूनही इलेक्ट्रिसिटी ड्युटी (वीज शुल्क) आकारण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.
या संभाव्य निर्णयामुळे जिल्ह्यातील सुमारे ३० हजार सोलर ग्राहकांवर आर्थिक बोजा वाढणार असून, आधीच विविध शुल्कांचा सामना करणाऱ्या ग्राहकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
उपलब्ध आकडेवारीनुसार, संभाजीनगर परिमंडळात सध्या ३८ हजारांहून अधिक ग्राहक सौर ऊर्जेच्या माध्यमातून वीज निर्मिती करत आहेत. या माध्यमातून सुमारे १३३ मेगावॅट वीज निर्माण केली जाते. वीज बिलात बचत आणि पर्यावरणपूरक ऊर्जा वापर या उद्देशाने अनेकांनी सोलर पॅनेलवर मोठी गुंतवणूक केली आहे. मात्र, नवीन कर लागू झाल्यास या गुंतवणुकीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या प्रस्तावित निर्णयावर नागरिकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, सोलर वापरूनही अतिरिक्त शुल्क भरावे लागत असल्याने हा निर्णय अन्यायकारक असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. आधीच वीज दरवाढीमुळे त्रस्त असलेल्या ग्राहकांना या नव्या करामुळे आणखी आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर, सोलर पॅनेल वापरण्याचा निर्णय योग्य ठरेल का, असा प्रश्न नागरिकांमध्ये निर्माण झाला असून, सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी जोर धरत आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429


