Maharashtra

कुत्र्यामुळे झालेल्या नुकसानावरून वाद पेटला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल:-

कुत्र्यामुळे झालेल्या नुकसानावरून वाद पेटला; दोघांविरुद्ध गुन्हा दाखल:-

जि. पुणे. ता. (दौंड): दि. 19 एप्रिल 2026:-
यवत येथील दोरगेवाडी परिसरात शेतातील नुकसानाच्या कारणावरून झालेला वाद विकोपाला जाऊन चाकू हल्ल्यापर्यंत पोहोचल्याची गंभीर घटना शनिवारी (दि. 18 एप्रिल 2026) सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेत विजय दिवेकर हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सौ. माधुरी विजय दिवेकर (वय 47, व्यवसाय शेती, रा. दोरगेवाडी, यवत, ता. दौंड) यांच्या शेतात आरोपींच्या कुत्र्याने फुलांच्या झाडांचे नुकसान केल्याने वादाची ठिणगी पडली. याबाबत जाब विचारण्यासाठी फिर्यादी व त्यांचे पती विजय दिवेकर यांनी आरोपींशी संपर्क साधला. त्यावेळी आरोपी शुभम ज्ञानेश्वर दिवेकर याने “नुकसान भरपाई देतो” असे सांगत बोलावून घेतले; मात्र त्यानंतर अचानक वाद वाढून शिवीगाळ व मारहाण करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दरम्यान, भांडण सोडविण्याच्या उद्देशाने पुढे आलेल्या फिर्यादींना आरोपींकडून ढकलण्यात आले. त्यानंतर आरोपी शुभम दिवेकर याने खिशातून लोखंडी चाकू काढून विजय दिवेकर यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. त्यांच्या पोटावर व पाठीवर सपासप वार करण्यात आल्याने ते जखमी झाले. घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पुष्पा ज्ञानेश्वर दिवेकर व शुभम ज्ञानेश्वर दिवेकर (दोघे रा. दोरगेवाडी, यवत) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 109, 352, 351 (2)(3), 3(5) अन्वये गुन्हा क्रमांक 354/2026 दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याची नोंद पोलीस उपनिरीक्षक मारुती मेतलवाड यांनी केली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुवर्णा गोसावी करीत आहेत. पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button