मराठी सक्तीला तीव्र विरोध; रिक्षा-टॅक्सी चालकांचा ४ मेपासून संपाचा इशारा

मराठी सक्तीला तीव्र विरोध; रिक्षा-टॅक्सी चालकांचा ४ मेपासून संपाचा इशारा
मुंबई, २१ एप्रिल २०२६: राज्य सरकारने रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरातील चालक संघटनांनी तीव्र विरोध दर्शवला आहे. २८ एप्रिलपर्यंत हा निर्णय मागे घेतला नाही, तर ४ मेपासून बाजारपेठा, रेल्वे स्थानके आणि बस डेपो परिसरात आंदोलन व संप छेडण्यात येईल, असा इशारा ऑटो रिक्षा चालक-मालक संयुक्त कृती समितीने दिला आहे.
या निर्णयानुसार, १ मे २०२६ पासून चालकांना मराठी भाषा वाचता, लिहिता आणि बोलता येणे बंधनकारक राहणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर परवाना रद्द करण्यासह कडक कारवाई केली जाणार असून, मोटार परिवहन विभागाच्या ५९ प्रादेशिक कार्यालयांमार्फत तपासणी मोहीम राबवली जाणार आहे.
या निर्णयाचा परिणाम राज्यातील सुमारे १५ लाख रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार असल्याचा दावा संघटनांनी केला आहे. विशेषतः अमराठी चालकांना यामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागेल, असे सांगितले जात आहे. वसई-विरार आणि मुंबई उपनगरांमध्ये काही ठिकाणी निदर्शने सुरू झाली असून, चालकांमध्ये नाराजी वाढताना दिसत आहे. या निर्णयामुळे लाखो कुटुंबांच्या उपजीविकेवर परिणाम होईल, अशी भीतीही व्यक्त करण्यात आली आहे.
दरम्यान, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी या निर्णयाचे समर्थन करताना प्रवाशांशी संवाद साधण्यासाठी मराठी भाषा आवश्यक असल्याचे सांगितले. काही संघटनांनी चालकांसाठी मराठी शिकवणी वर्ग सुरू केल्याचेही त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर, ४ मेपासून होणाऱ्या संपामुळे मुंबईसह राज्यातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. चालक नेत्यांनी “मराठीचा आदर आहे, मात्र सक्ती मान्य नाही,” अशी भूमिका स्पष्ट केली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429