जत तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा कहर; वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू:-
जत तालुक्यात विजांच्या कडकडाटासह पावसाचा कहर; वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू:-
जि. सांगली. ता. (जत):-दि. 23 एप्रिल 2026:-
जत तालुक्यातील बाज येथील एका तरुणाचा वीज कोसळून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यात, विशेषतः बाज आणि कंठी परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अयाज फिरोज मुजावर (रा. बाज) हे आपल्या दोन सहकाऱ्यांसह कंठी येथून मोटरसायकलवरून प्रवास करत होते . यावेळी अचानक हवामानात बदल होऊन वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट सुरू झाला. प्रवास सुरू असतानाच अचानक अयाज यांच्या अंगावर वीज कोसळली . या भीषण दुर्घटनेत अयाज यांचा जागीच मृत्यू झाला.
या घटनेत अयाज यांच्यासोबत असलेले अन्य दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत . स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले असून, त्यांच्यावर सध्या वैद्यकीय उपचार सुरू आहेत.
*परिसरात शोककळा*
अयाज मुजावर हे परिसरात एक मनमिळाऊ व्यक्तिमत्व म्हणून परिचित होते. त्यांच्या अशा अकाली निधनामुळे बाज गावावर दुःखाचे सावट पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून पुढील कार्यवाही सुरू आहे.
*प्रशासनाचे आवाहन*
हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, वादळी पाऊस आणि विजांचा कडकडाट सुरू असताना नागरिकांनी झाडाखाली किंवा उघड्यावर न थांबता सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.