Maharashtra

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल शिक्षणातही आघाडीवर

ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळा डिजिटल शिक्षणातही आघाडीवर

रहीमाबाद (ता. सिल्लोड) : (प्रतिनिधी :महेंद्र बेराड)
जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, रहीमाबाद (केंद्र रहीमाबाद, ता. सिल्लोड) येथे विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षणाची जोड देत डिजिटल धड्यांची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतचे वर्ग असलेल्या या शाळेत सुमारे 320 विद्यार्थी शिक्षण घेत असून, ग्रामीण भागातही तंत्रज्ञानाधारित शिक्षणाची चळवळ बळकट होताना दिसत आहे.

शाळेत स्किल ट्रीच्या माध्यमातून अत्याधुनिक संगणक लॅब उपलब्ध झाली असून, यामुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष संगणक हाताळण्याची संधी मिळत आहे. संगणक शिक्षिका श्रीमती खेसर मॅडम या विद्यार्थ्यांना वयानुसार संगणकाचे मूलभूत ज्ञान देत आहेत. यामध्ये संगणकाची प्राथमिक ओळख, कोडिंगचे प्रारंभिक धडे, तसेच एमएस वर्ड, एक्सेल यांसारख्या उपयुक्त सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण दिले जात आहे.

विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यापूर्वी अशा डिजिटल साधनांचा कमी परिचय होता. मात्र आता या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढत असून, ते तंत्रज्ञानाशी सहज जुळवून घेत आहेत. डिजिटल शिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेतही सकारात्मक बदल दिसून येत आहे.

शाळेतील शिक्षकवर्ग आणि मुख्याध्यापक यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वीपणे राबविला जात असून, पालकांकडूनही या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. डिजिटल युगात स्पर्धा करण्यासाठी विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद ठरत आहे.

एकूणच, जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा, रहीमाबाद ही ग्रामीण भागातील इतर शाळांसाठी आदर्श ठरत असून, डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे भविष्य उज्ज्वल करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button