आजरा शहरातील धोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाईची मागणी; रहिवासी अन्याय निवारण समितीचे निवेदन:-
आजरा शहरातील धोकादायक इमारतींवर तात्काळ कारवाईची मागणी; रहिवासी अन्याय निवारण समितीचे निवेदन:-
जि. कोल्हापूर. ता. (आजरा);दि. 21 एप्रिल 2026:
आजरा शहर आणि नगरपंचायत हद्दीतील जीर्ण व धोकादायक इमारतींमुळे नागरिकांच्या जीविताला गंभीर धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर ‘आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती’च्या वतीने नगरपंचायत प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून, अशा इमारतींवर तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
अपघात टाळण्यासाठी तातडीच्या उपाययोजना आवश्यक
समितीने दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शहरात अनेक ठिकाणी अत्यंत जुने व जर्जर इमारतींचे अस्तित्व आहे. दिनांक २० एप्रिल रोजी घडलेल्या दुर्घटनेचा संदर्भ देत, भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलणे गरजेचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नगरपंचायतीने संपूर्ण शहराचे सर्वेक्षण करून धोकादायक इमारतींची अधिकृत यादी जाहीर करावी, तसेच संबंधित मालकांना नोटीस देऊन दुरुस्ती किंवा पाडकामाची कार्यवाही करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
नगरपंचायत प्रशासन या गंभीर विषयावर किती लवकर आणि ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण आजरा शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे.