पुणे जिल्ह्यात खळबळ; जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा भीषण अपघातात मृत्यू.
पुणे जिल्ह्यात खळबळ; जुन्नरचे नायब तहसीलदार अनंता गवारी यांचा भीषण अपघातात मृत्यू

जुन्नर (प्रतिनिधी) – पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात रविवारी सकाळी एक धक्कादायक अपघात घडला. बनकरफाटा–जुन्नर मार्गावरील गणपती फाट्याजवळ हायवा आणि कार यांची समोरासमोर भीषण धडक होऊन निवडणूक नायब तहसीलदार अनंता गवारी (वय ५२) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जखमी अवस्थेत त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात येत असताना त्यांनी वाटेतच अखेरचा श्वास घेतला.
या अपघातात त्यांच्यासोबत असलेले महसूल कर्मचारी विजय खर्तोडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की कार पूर्णपणे चक्काचूर झाली असून घटनास्थळी पाहणाऱ्यांचे काळीज पिळवटून निघाले.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून हा अपघात की घातपात, याबाबत परिसरात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू असून पुढील माहितीची प्रतीक्षा आहे.
दरम्यान, अनंता गवारी यांच्या आकस्मिक निधनामुळे महसूल विभागात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या निधनाने प्रशासनातील एक कर्तव्यदक्ष अधिकारी हरपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे.

