जिममध्ये जाण्याच्या वादातून मुरादाबादमध्ये पतीने केली पत्नीची हत्या
जिममध्ये जाण्याच्या वादातून मुरादाबादमध्ये पतीने केली पत्नीची हत्या
पत्नीच्या जिममध्ये जाण्यावरून झालेल्या वादातून पतीने संतापाच्या भरात तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे
मिळालेल्या माहितीनुसार, मृत महिला नियमितपणे जिममध्ये जात होती. मात्र तिच्या या सवयीला पतीचा विरोध होता. याच कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत होते. घटनेच्या दिवशी हा वाद तीव्र झाला आणि संतापलेल्या पतीने लोखंडी दांड्याने पत्नीवर हल्ला केला. गंभीर मारहाणीमुळे तिचा जागीच मृत्यू झाला.
हत्या केल्यानंतर आरोपीने गुन्हा लपवण्याचा प्रयत्न केला. त्याने पत्नीचा मृतदेह अनेक तास घरातील पलंगावरच ठेवून दिला. नंतर पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्याने पत्नी जखमी झाल्याचे सांगत स्वतःच माहिती दिली.
मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी सखोल चौकशी केली. चौकशीदरम्यान आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली.
समाजात संतापाची लाट
या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. एका निरपराध महिलेचा जीव गेला असून, तिच्या लहान मुलीवर मातृछत्र हरपल्याची शोकांतिका ओढवली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429

