कष्टकरी कुटुंबातील लेकीची ‘सीए’पर्यंत झेप; मावळात वृषाली सांगळेचे कौतुक.

पिंपरी चिंचवड प्रतिनिधी : आई शाळेत सफाई कामगार आणि वडील खासगी कंपनीत सुरक्षा रक्षक अशा साध्या कष्टकरी कुटुंबातील शिरगाव येथील वृषाली नामदेव सांगळे हिने जिद्द, चिकाटी आणि अथक परिश्रमाच्या जोरावर ‘सीए’ परीक्षा उत्तीर्ण होत उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
वृषालीचे मूळ गाव मावळ तालुक्यातील शिवली असून नोकरीनिमित्त तिचे कुटुंब सध्या शिरगाव येथे वास्तव्यास आहे. तिचे प्राथमिक शिक्षण शिरगाव येथील शारदाश्रम प्राथमिक आश्रमशाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालयात पूर्ण झाले. शालेय जीवनापासूनच अभ्यासू, शिस्तप्रिय आणि ध्येयवेडी विद्यार्थिनी म्हणून तिची ओळख होती.
२०१८ मध्ये तिने सीए फाउंडेशन परीक्षेची तयारी केली होती. मात्र पहिल्याच प्रयत्नात अपयश आले. तरीही न डगमगता तिने पुन्हा जोमाने अभ्यास सुरू ठेवला. २०२० मध्ये तिने सीए इंटरमिजिएट परीक्षा उत्तीर्ण करत आर्टिकलशिप पूर्ण केली. त्यानंतर जानेवारी महिन्यात झालेल्या अंतिम परीक्षेच्या तयारीसाठी तिने तळेगाव दाभाडे येथील गणेश वाचनालयात दररोज तब्बल बारा तास अभ्यास करत मेहनत घेतली आणि अखेर सीए परीक्षेत यश मिळविले.
वृषालीच्या या यशाबद्दल मावळ तालुक्यात सर्वत्र तिचे कौतुक होत आहे. या प्रवासात तिला सीए ज्ञानेश्वर गोपाळे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, वृषालीने प्रतिकूल परिस्थितीत मिळविलेल्या या यशाबद्दल तिचे मावळचे आमदार श्री सुनीलअण्णा शेळके व शिरगावच्या सरपंच पल्लवीताई गोपाळे यांनी रुषालीचे कौतुक केले व शिरगाव येथील शारदाश्रम विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे कार्यवाह रवी जाधव, कल्पना कविटकर, उमेश कविटकर, मुख्याध्यापक विजय लोखंडे, रमेश फरताडे आदी उपस्थित होते.
- प्रतिनिधी: शाम शिरसाठ पुणे
