भोसरीत भारत गॅस वितरकाचा मनमानी कारभार? ऑनलाईन पेमेंटला नकार; ग्राहकांकडून वाढीव रक्कम वसुलीचा आरोप
भोसरीत भारत गॅस वितरकाचा मनमानी कारभार? ऑनलाईन पेमेंटला नकार; ग्राहकांकडून वाढीव रक्कम वसुलीचा आरोप
,९/०३/२०२६ भोसरी परिसरात घरगुती गॅस सिलिंडरचे वितरण करणाऱ्या गुजर एन्टरपायजेस् या भारत गॅस वितरक एजन्सीच्या कारभाराबाबत ग्राहकांकडून गंभीर तक्रारी पुढे येत आहेत. ऑनलाईन बुकिंग करूनही ग्राहकांकडून जादा रक्कम आकारली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
भोसरीतील अनेक ग्राहकांनी सांगितले की, गॅस सिलिंडरचे बुकिंग ऑनलाईन केले असता मोबाईलवर OTP आणि पावती मिळते. मात्र सिलिंडर वितरणासाठी येणारे कर्मचारी ऑनलाईन पेमेंट स्वीकारण्यास नकार देतात. अधिकृत किंमत सुमारे ९१६ रुपये असताना ग्राहकांकडून ९४० रुपये देण्याची मागणी केली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
आधीच वाढत्या महागाईमुळे गृहिणींचे बजेट कोलमडले असताना या प्रकारामुळे सर्वसामान्य नागरिकांना आर्थिक फटका बसत आहे. याशिवाय काही कर्मचारी ग्राहकांशी उद्धटपणे वागतात, अशीही तक्रार करण्यात येत आहे.
“गॅस बुकिंगची सुविधा ऑनलाईन आहे, मग पेमेंटची सुविधा ऑनलाईन का देत नाही?” असा सवालही ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे. या प्रकारामुळे गॅस वितरणात गैरव्यवहार किंवा काळाबाजार होत असल्याची शंका नागरिक व्यक्त करत आहेत.
या प्रकरणाची संबंधित प्रशासनाने चौकशी करून ग्राहकांना न्याय द्यावा, अशी मागणी भोसरीतील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
प्रतिनिधी विजय अडसूळ

