उकाडा जीवावर उठला… महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी;
उकाडा जीवावर उठला… महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी;
जि. अकोला :दि. 15 एप्रिल 2026:
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्याच्या प्रत्येक विभागात सूर्य आग ओकत आहे. अकोला जिल्ह्यात गेल्या दोन ते तीन दिवसापासून उष्णतेचा कहर पहायला मिळत असून अकोल्याचे तापमान 44 अंश सेल्सिअस वर गेलं आहे. त्यामुळे नागरिकांनी काम असेल तरच घराचं बाहेर पडावं असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे, कारण अजून तीन ते चार दिवस अशी उष्णतेची लाट जाणवणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे. अशातच अकोल्यामध्ये उष्मघाताचा पहिला बळी गेल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
उष्माघाताचा पहिला बळी
अकोला शहरातील जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत एका मालवाहू ऑटोमध्ये अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबत माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले, मृतदेहाच्या अंगावर कुठल्याही मारहाणीचा तसेच जखमा नाहीत. कदाचित या व्यक्तीचा उष्माघातामुळे मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून मृतदेहाच्या वैद्यकीय अहवालानंतरच मृत्यूचं मूळ कारण स्पष्ट होईल. मात्र पोलिसांनी या मृत्यू मागे उष्माघाताचा संशय व्यक्त केला आहे. त्यामुळे अकोल्यात पहिला उष्माघाताचा बळी गेला असल्याची बातमी आली आहे.
पत्रकार :विजय रणभोर, पुणे