मुंबई : दहिसरमध्ये तरुणीवर अमानुष मारहाण; आरोपीला तात्काळ अटक
मुंबई : दहिसरमध्ये तरुणीवर अमानुष मारहाण; आरोपीला तात्काळ अटक
मुंबई : दहिसर पश्चिम परिसरातील नवागाव, शास्त्रीनगर येथील शिवमंदिरासमोर एका तरुणीवर अमानुष मारहाण झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याचे फुटेज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, एमएचबी पोलीस ठाणे हद्दीत ही घटना घडली. एका तरुणाने संबंधित तरुणीला रस्त्यावर अडवून लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. या घटनेमागे प्रेमप्रकरण असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत अवघ्या एका तासात आरोपीला अटक केली. त्याच्यावर संबंधित कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांकडून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. विशेष म्हणजे, पीडित तरुणीने अद्याप अधिकृत तक्रार दाखल केलेली नसल्याची माहिती समोर आली आहे.
ही घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणणारी ठरली आहे. गजबजलेल्या मुंबईसारख्या शहरात सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे मारहाण होणे अत्यंत चिंताजनक असून, प्रशासनाने महिला सुरक्षेसाठी अधिक कडक उपाययोजना करणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई