तहसीलदारांसमोरच कर्मचाऱ्यांची खरडपट्टी;गरिबांची अडवणूक थांबवा, अन्यथा थेट महसूल मंत्र्यांकडे पुराव्यानिशी तक्रार करण्याचा इशारा
तहसीलदारांसमोरच कर्मचाऱ्यांची खरडपट्टी;गरिबांची अडवणूक थांबवा, अन्यथा थेट महसूल मंत्र्यांकडे पुराव्यानिशी तक्रार करण्याचा इशारा
जत (प्रतिनिधी) : जत तहसील कार्यालयातील अनागोंदी कारभार आणि सामान्य शेतकऱ्यांच्या होणाऱ्या छळाचा पाढा आज जिल्हा परिषद सदस्य सुनील पवार यांनी भर चौकात नव्हे,तर थेट तहसीलदार कार्यालयातच वाचला. “महसूल विभाग हा लोकांच्या सेवेसाठी आहे की लुटीसाठी?” असा संतप्त सवाल करत सुनील पवार यांनी भ्रष्ट कर्मचाऱ्यांची चांगलीच ‘झाडाझडती’ घेतली. यामुळे जत तहसील कार्यालयात एकच खळबळ माजली असून भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार,काराजनगी येथील गरीब शेतकरी साध्या कामासाठी गेल्या सहा महिन्यांपासून तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवत आहेत. एक महसूल सहाय्यक आणि तांत्रिक अधिकारी या शेतकऱ्यांना केवळ ‘आज या – उद्या या’ असे सांगून मानसिक त्रास देत होते. धक्कादायक बाब म्हणजे, आमदार गोपीचंद पडळकर आणि खुद्द तहसीलदारांनी सूचना देऊनही हे मुजोर कर्मचारी कामात टाळाटाळ करत होते.
सुनील पवार यांनी या प्रकरणाचा मुळापासून छडा लावला असता धक्कादायक वास्तव समोर आले. फेरफार,उतारे किंवा साध्या परवानग्यांसाठी ही मंडळी २० ते ६० हजार रुपयांची उघड मागणी करत असल्याचा आरोप पवार यांनी केला आहे. “कागदपत्रे अपूर्ण आहेत” असे करणे सांगून शेतकऱ्यांना हेलपाटे मारायला लावणे,ही या विभागातील कायमची पद्धत बनली आहे, असा घणाघात त्यांनी केला.
वैतागलेल्या शेतकऱ्यांसह सुनील पवार यांनी आज तहसीलदार धानोरकर यांची भेट घेतली. संबंधित कर्मचाऱ्यांना केबिनमध्ये बोलावताच वातावरण तापले.पवार यांनी थेट पुराव्यांसह जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी पवार आणि कर्मचाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. पवारांचा आक्रमक पवित्रा पाहून अखेर तहसीलदारांना मध्यस्थी करावी लागली.
“गोरगरीब शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” अशा शब्दांत सुनील पवार यांनी सुनावले. यापुढे जर एकाही शेतकऱ्याला विनाकारण त्रास दिला किंवा पैशांची मागणी केली, तर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सर्व पुराव्यांसह तक्रार करून संबंधित कर्मचाऱ्यांचे निलंबन होईपर्यंत स्वस्थ बसणार नाही,असा ‘अल्टिमेटम’ त्यांनी दिला आहे.
प्रतिनिधी : संजय कोळी.जत/सांगली.
७८७५९०३७७७.
