थेरगावात श्री बापुजीबुवा महाराज उत्सव आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात
थेरगावात श्री बापुजीबुवा महाराज उत्सव आणि मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात
थेरगाव येथील ग्रामदैवत श्री बापुजीबुवा महाराज उत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला श्री हनुमान मूर्ती, शितलादेवी आणि शनि महाराज प्राणप्रतिष्ठा तसेच भव्य कलशारोहण सोहळा मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात पार पडला. अक्षय तृतीया या शुभ मुहूर्तावर झालेल्या या कार्यक्रमासाठी थेरगाव व परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली
उत्सवाची सुरुवात शनिवारी सायंकाळी भव्य मिरवणुकीने झाली. केजुदेवी बोटिंग क्लब येथून निघालेली मिरवणूक हनुमान मंदिरापर्यंत वाजत-गाजत काढण्यात आली. यामध्ये भाविकांसह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मिरवणुकीनंतर सायंकाळी ह.भ.प. श्री. सागर महाराज शेंडगे यांच्या कीर्तनाने वातावरण भक्तिमय झाले. त्यांनी कीर्तनातून भक्ती, संस्कार आणि समाजएकतेचा संदेश दिला.
रविवारी सकाळी ११ वाजता मुख्य धार्मिक विधींना सुरुवात झाली. श्री हनुमान, शितलादेवी आणि शनि महाराज यांच्या मूर्तींची शास्त्रोक्त पद्धतीने प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यासोबतच मंदिरावर भव्य कलशारोहण सोहळा ह.भ.प. श्री. कालिदास महाराज घोडके (बाल ब्रह्मचारी) यांच्या शुभहस्ते पार पडला.
विधीदरम्यान करण्यात आलेल्या होम-हवनामुळे संपूर्ण परिसर मंगलमय झाला होता.
या सोहळ्यानिमित्त रविवारी सायंकाळी ८ ते १० या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. ‘वीर देवस्थान’ आणि स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले.
ग्रामदैवताच्या या उत्सवामुळे थेरगाव परिसरात आनंद, श्रद्धा आणि चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून, भाविकांनी मोठ्या भक्तीभावाने सहभाग नोंदवला.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

