ठाणे नौपाड्यात प्राची फॅशन स्टोअरला भीषण आग; ३ तासांत नियंत्रण

ठाणे नौपाड्यात प्राची फॅशन स्टोअरला भीषण आग; ३ तासांत नियंत्रण
ठाणे, २० एप्रिल २०२६ : नौपाडा परिसरातील गोखले रोड येथे पॅराडाईज सोसायटीजवळ असलेल्या प्राची फॅशन स्टोअरमध्ये आज पहाटे भीषण आग लागल्याची घटना घडली. सकाळी सुमारे ५:४० वाजता लागलेल्या या आगीने तळमजल्यावरील सुमारे २५०० चौरस फूट दुकान पूर्णपणे व्यापले होते.
आगीची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. नगरसेवक संजय वाघुले, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय. एम. तडवी आणि मुख्य अग्निशमन अधिकारी गिरीश झळके यांच्या नेतृत्वाखाली बचावकार्य राबवण्यात आले.
या कारवाईत ३ अग्निशमन बंब, २ पाण्याचे टँकर, रेस्क्यू व्हॅन तसेच जेसीबीच्या मदतीने आग विझवण्याचे प्रयत्न करण्यात आले. सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर सकाळी ८:४० वाजता आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात यश आले.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, संपूर्ण दुकान जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
या प्रसंगी नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत तातडीने कार्यवाही केल्याबद्दल ठाणे महापालिका आणि अग्निशमन दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
प्रतिनिधी सिंथिया कोरिया मुंबई

