राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलिस अधीक्षक
राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; श्रीकांत धिवरे जळगावचे नवे पोलिस अधीक्षक
जळगाव | राज्याच्या गृह विभागाने २० एप्रिल २०२६ रोजी भारतीय पोलीस सेवेतील (IPS) अधीक्षक/उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या जाहीर केल्या आहेत. या बदल्यांमध्ये धुळे जिल्ह्यातील कडक शिस्त आणि धडाकेबाज कारवाईसाठी ओळखले जाणारे श्रीकांत धिवरे यांची जळगाव जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
धिवरे यांनी धुळे जिल्ह्यात कार्यकाळात कायदा व सुव्यवस्था मजबूत ठेवत प्रभावी कामगिरी बजावली होती. त्यामुळे त्यांची जळगावसारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यात नियुक्ती करण्यात आल्याचे मानले जात आहे.
दरम्यान, जळगावचे विद्यमान पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांची बदली पुण्यातील राज्य गुन्हे अन्वेषण विभागात (Crime Branch) अधीक्षक पदावर करण्यात आली आहे.
या आदेशानुसार इतरही महत्त्वाच्या बदल्या करण्यात आल्या आहेत:
साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची सांगली येथे बदली
पुणे पोलीस उपआयुक्त निखिल पिंगळे यांची साताऱ्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती
सांगलीचे पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांची मुंबई राज्य गुप्तचर विभागात बदली
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांच्याकडे गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक पदाचा अतिरिक्त कार्यभार
गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक निलोप्तल यांची कोल्हापूर येथे बदली
अतिरिक्त पोलीस अधीक्षक एम. सेरा यांना पदोन्नती देऊन गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती
पुणे पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांची वाशिम येथे पोलीस अधीक्षक म्हणून बदली
या व्यापक बदल्यांमुळे राज्याच्या पोलीस प्रशासनात मोठा फेरबदल झाला असून, कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे सांगितले आहे.
प्रतिनिधी सुमेश मुळे