Maharashtra

जुन्नर महसूल विभागावर शोककळा; भीषण अपघातात नायब तहसीलदारांचा मृत्यू

जुन्नर महसूल विभागावर शोककळा; भीषण अपघातात नायब तहसीलदारांचा मृत्यू

जुन्नर (पुणे):
जुन्नर तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुर्दैवी बातमी समोर आली आहे. ओतूर-जुन्नर मार्गावर झालेल्या एका भीषण रस्ते अपघातात जुन्नरचे निवडणूक नायब तहसीलदार अनंता बनाजी गवारी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण जुन्नर तालुक्यासह महसूल विभागात मोठी शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, नायब तहसीलदार अनंता गवारी हे आपल्या महसूल विभागातील दोन सहकाऱ्यांसह कारने जात होते. ओतूर-बनकरफाटा दरम्यान असलेल्या गणपती फाट्याजवळील ‘एस’ (S) कॉर्नरवर समोरून येणाऱ्या एका भरधाव हायवा (डंपर) आणि गवारी यांच्या कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. ही धडक इतकी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला आहे.
सहकारी गंभीर जखमी
या अपघातात अनंता गवारी यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्यासोबत कारमध्ये असलेले इतर दोन महसूल कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने ओतूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्याला हलवण्यात आले आहे.
प्रशासनावर शोककळा
अनंता गवारी हे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून परिचित होते. निवडणूक नायब तहसीलदार म्हणून त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी होती. त्यांच्या अचानक जाण्याने प्रशासकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. अपघात नेमका कशामुळे झाला आणि डंपर चालकाचा यात काय दोष होता, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

प्रतिनिधी स्वप्नील लुनावत

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button