माजी सरन्यायाधीशांच्या भेटीवरून वाद तीव्र; श्रद्धा की विचारधारा? समाजात रंगली चर्चा
माजी सरन्यायाधीशांच्या भेटीवरून वाद तीव्र; श्रद्धा की विचारधारा? समाजात रंगली चर्चा
अमरावती :माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची कुटुंबासह घेतलेली भेट सध्या राज्यात आणि देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरणाने वादाचे रूप धारण केले असून, विविध स्तरातून प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भूषण गवई यांनी धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले. न्यायव्यवस्थेतील सर्वोच्च पद भूषवलेल्या व्यक्तीने धार्मिक गुरूंच्या चरणी नतमस्तक होणे, यावरून विचारवंतांमध्ये मतभेद निर्माण झाले आहेत.
गवई हे प्रख्यात आंबेडकरी नेते रा. सू. गवई यांचे सुपुत्र असल्याने हा मुद्दा अधिक संवेदनशील बनला आहे. सामाजिक न्याय आणि विवेकवादी विचारांची परंपरा असलेल्या कुटुंबातील व्यक्तीची अशी कृती काहींना विसंगत वाटत आहे.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक अध्यक्ष श्याम मानव यांनी या भेटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले की—
“घटनात्मक पदावर राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे वागणे अत्यंत धक्कादायक आहे. यामुळे आंबेडकरी विचारसरणीला धक्का बसतो.”
त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद अधिकच चिघळला असून, समर्थक आणि विरोधक यांच्यात सोशल मीडियावर तीव्र चर्चा सुरू आहे.
धीरेंद्र कृष्ण शास्त्री हे त्यांच्या ‘दिव्य दरबार’ आणि चमत्कारांच्या दाव्यांमुळे वारंवार चर्चेत असतात. अनेक वेळा त्यांच्या कार्यक्रमांवरून अंधश्रद्धा आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यावरून वाद निर्माण झाले आहेत.
या प्रकरणानंतर सोशल मीडियावर स्पष्टपणे दोन गट पडले आहेत. एक गट हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय असल्याचे सांगत भूषण गवई यांचे समर्थन करत आहे. तर दुसरा गट सार्वजनिक जीवनातील व्यक्तींनी विवेकवादी भूमिका घ्यावी, असे म्हणत टीका करत आहे.
या वादामुळे पुन्हा एकदा “वैयक्तिक श्रद्धा विरुद्ध सार्वजनिक जबाबदारी” हा मुद्दा ऐरणीवर आला आहे. उच्च पदांवर काम केलेल्या व्यक्तींनी आपल्या वैयक्तिक श्रद्धा कितपत सार्वजनिक कराव्यात, यावर समाजात व्यापक चर्चा सुरू झाली आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429
