Maharashtra

नरसाळा गट्टी खदानीत महिलेचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप:-

नरसाळा गट्टी खदानीत महिलेचा बुडून मृत्यू; प्रशासनाच्या दुर्लक्षावर संताप:-

जि. यवतमाळ. ता. (मारेगाव):दि 20 एप्रिल 2026:
तालुक्यातील नरसाळा येथील सरकारी गट्टी खदानीत 65 वर्षीय वृद्ध महिलेचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बेबीबाई तुळशीराम राजगडकर या कपडे धुण्यासाठी खदानीतील पाण्याच्या खड्ड्याकडे गेल्या असता त्यांचा पाय घसरून त्या पाण्यात पडल्या. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, घटनेची माहिती नरसाळा येथील अनिल दुर्गे यांनी त्यांच्या मुलाला फोनद्वारे दिली. मुलगा तात्काळ घटनास्थळी दाखल झाला.

यानंतर पोलिसांच्या मदतीने महिलेस मारेगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, खदानी लीजवर दिल्यानंतर उत्खनन पूर्ण झाल्यावर मोठे खड्डे तसेच उघडे ठेवले जातात. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. गावात पाणीटंचाई असल्याने महिला या ठिकाणी कपडे धुण्यासाठी जातात, मात्र हे खड्डे अत्यंत धोकादायक असून जीवितहानीची शक्यता कायम असते.

या पार्श्वभूमीवर, अशा खड्ड्यांची तात्काळ भराव घालून सुरक्षितता उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात आणखी जीवितहानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे नरसाळा परिसरात शोककळा पसरली आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button