Maharashtra

भोंदू बाबा राजेंद्र गडगेचा ‘दत्तधाम दरबार’ सील; ५ दिवसांची पोलीस कोठडी

भोंदू बाबा राजेंद्र गडगेचा ‘दत्तधाम दरबार’ सील; ५ दिवसांची पोलीस कोठडी

अहिल्यानगर (संगमनेर):
संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे धर्माच्या नावाखाली अंधश्रद्धा पसरवणाऱ्या कथित ‘दत्तधाम दरबार’वर पोलिसांनी धडक कारवाई करत संपूर्ण परिसर सील केला आहे. भोंदू बाबा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राजेंद्र गडगे याच्या अटकेनंतर या प्रकरणाने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
रविवारी पोलिसांनी दरबारावर छापा टाकत सुमारे चार तास सखोल झाडाझडती केली. या दरम्यान ‘स्पॉट पंचनामा’ करण्यात आला असून विविध प्रकारची संशयित औषधे जप्त करण्यात आली आहेत. ही औषधे भाविकांना कोणत्या पद्धतीने दिली जात होती आणि त्यामागे कोणते गैरप्रकार आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, राजेंद्र गडगे गेल्या दहा वर्षांपासून या ठिकाणी दरबार भरवून दैवी शक्तीचा दावा करत भाविकांची दिशाभूल करत होता. लोकांच्या अडचणींचा फायदा घेत अंधश्रद्धा पसरवण्याचा प्रकार सुरू असल्याचे तपासात समोर आले आहे.
या प्रकरणी अंधश्रद्धा निर्मूलन कायदा तसेच इतर संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली. न्यायालयात हजर केल्यानंतर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून न्यायालयाने गडगे याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, पोलिसांच्या या कारवाईचे स्थानिक नागरिकांनी स्वागत केले असून, अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात अडकू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button