Maharashtra

अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाईची मागणी; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष:-

अवैध गौण खनिज उत्खननावर कारवाईची मागणी; प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष:-

जि. छत्रपती संभाजीनगर : ता. सोयगाव :दि. 18 एप्रिल 2026;
सोयगाव तहसील कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या विविध रस्त्यांच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज उत्खनन करून त्याची बेकायदेशीर वाहतूक होत असल्याचा आरोप करत संबंधित ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई करून शासनाचा महसूल वसूल करण्याची मागणी बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत तहसीलदार मनिषा मेने-जोगदंड यांना लेखी निवेदन देण्यात आले आहे.

बल्लाळेश्वर युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तथा माहिती अधिकार कार्यकर्ते हरिभाऊ पाटील यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फर्दापूर-नागद तसेच नांदगाव तांडा ते पाचोरा या मार्गांच्या काँक्रीटीकरण व रस्ता रुंदीकरणाच्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात डबर, मुरूम आणि माती यांसारख्या गौण खनिजांचा वापर केला जात आहे. मात्र या खनिजांचे विविध गटातून व गावांच्या हद्दीतून परवानगीशिवाय उत्खनन करून असंख्य वाहनांद्वारे रात्रंदिवस वाहतूक होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच गौण खनिज वाहतुकीसाठी देण्यात आलेल्या परवान्यांमध्ये वाहनांचे क्रमांक नमूद नसल्यामुळे एकाच परवान्याच्या आधारे अनेक वाहनांमधून अवैध वाहतूक सुरू असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. यामुळे शासनाच्या महसुलाला मोठा फटका बसत असून, संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष होत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर संबंधित ठिकाणी पंचनामा करून अवैध उत्खनन करणाऱ्या ठेकेदारांवर शासन नियमाप्रमाणे प्रति ब्रास दंड आकारावा तसेच बेकायदेशीर उत्खनन व वाहतुकीवर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, या गंभीर तक्रारीनंतर तहसील प्रशासन कोणती भूमिका घेणार, तसेच अवैध गौण खनिज उत्खननाला आळा बसणार का, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button