Maharashtra

वारजे माळवाडीतील सलूनमध्ये गोळीबार; दोन जखमी, चार आरोपी ताब्यात

वारजे माळवाडीतील सलूनमध्ये गोळीबार; दोन जखमी, चार आरोपी ताब्यात

पुणे (वारजे माळवाडी): शहरातील वारजे माळवाडी परिसरात चैतन्य चौकाजवळील एका सलूनमध्ये शुक्रवारी (२४ एप्रिल २०२६) सायंकाळी धक्कादायक गोळीबाराची घटना घडली. या हल्ल्यात दोन जण जखमी झाले असून पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सायंकाळी सुमारे ६:४० ते ८ वाजण्याच्या दरम्यान ५ ते ६ जणांची टोळी दुचाकींवरून सलूनमध्ये घुसली. त्यांनी लक्ष्य असलेल्या एका व्यक्तीवर गोळीबार केला. केस कापत असताना त्याच्या डाव्या कानाजवळ गोळी लागली. यावेळी सलूनमध्ये उपस्थित असलेला एक निष्पाप नागरिकही जखमी झाला.
घटनेची माहिती मिळताच गस्तीवर असलेल्या वारजे माळवाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दोन आरोपींना जागीच अटक करण्यात आली असून त्यांच्या ताब्यातून एक पिस्तूल जप्त करण्यात आले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एकूण ५ ते ६ आरोपींची ओळख पटली असून उर्वरित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके कार्यरत आहेत. आतापर्यंत चार जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
जखमींना तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोघांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गोळीबार सुरू असताना एका पोलिस कर्मचाऱ्याने जीव धोक्यात घालून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले. या धाडसी कृतीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्राथमिक तपासानुसार हा हल्ला जुन्या शत्रुत्वातून किंवा ड्रग्सशी संबंधित वादातून झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. २०२३ मधील एका प्रकरणाशी या घटनेचा संबंध असू शकतो, असा अंदाज पोलिसांकडून वर्तवण्यात येत आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून फरार आरोपींचा शोध घेतला जात आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी
9822548429

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button