कांचन नगर आरोग्य केंद्र २४ तास बंद; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
कांचन नगर आरोग्य केंद्र २४ तास बंद; नागरिकांच्या आरोग्याशी खेळ
जळगाव | प्रतिनिधी: सुमेश मुळे
जळगाव शहरातील कांचन नगर परिसरातील शहरी आरोग्य वर्धिनी केंद्राची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे. सदर आरोग्य केंद्र २४ तास बंदच राहत असल्याने नागरिकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ होत असल्याची तीव्र नाराजी स्थानिकांमधून व्यक्त होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, या आरोग्य केंद्रात आरोग्य सेवक किंवा सेविका यांपैकी कोणीही नियमितपणे उपस्थित नसते. त्यामुळे कांचन नगर परिसरातील नागरिकांना प्राथमिक आरोग्य सेवा मिळण्यात मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागत आहे. आजारपणाच्या वेळी तातडीची मदत मिळत नसल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
याशिवाय, आरोग्य केंद्राची स्वच्छता देखील अत्यंत चिंताजनक आहे. केंद्र परिसर पूर्णपणे अस्वच्छ असून स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाल्याचे स्पष्ट दिसून येते. इतकेच नव्हे, तर काही नागरिकांनी या ठिकाणी आपली दैनंदिन वापरातील वस्तू ठेवण्यास सुरुवात केली आहे. केंद्राच्या आवारात टू-व्हीलर, फोर-व्हीलर आणि इतर वाहने पार्क केली जात असल्याने आरोग्य केंद्राचा मूळ उद्देशच हरवत चालला आहे.
या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून संबंधित प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन आरोग्य केंद्र सुरू करावे, नियमित कर्मचारी नियुक्त करावेत आणि स्वच्छता राखावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
