पारध पोलिसांची वालसावंगी, वाढोणा, शेलूद येथे अवैध दारू विक्रेत्यांवर धडाकेबाज कारवाई

पारध पोलिसांची वालसावंगी, वाढोणा, शेलूद येथे अवैध दारू विक्रेत्यांवर धडाकेबाज कारवाई
पारध | प्रतिनिधी/ महेंद्र बेराड
भोकरदन तालुक्यातील पारध शाहूराजे पोलीस ठाण्याच्या हद्दीत वालसावंगी, धावडा व वाढोणा परिसरात अवैध देशी दारू विक्री करणाऱ्यांवर पारध पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.
पहिल्या कारवाईत वालसावंगी बसस्थानक परिसरात आरोपी तुकाराम हरि वाघ हे खुलेआम देशी दारू विक्री करताना आढळून आले. त्यांच्याकडून 90 मिलीच्या 107 सीलबंद देशी दारूच्या बाटल्या (एकूण किंमत ₹6,420) जप्त करण्यात आल्या. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 103/2025, कलम 65 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जमादार पी. एन. सिनकर करीत आहेत.
दुसऱ्या कारवाईत पारध ते पिंपळगाव रेणुकाई मार्गावर आरोपी अमोल साहेबराव बारोटे हे रस्त्याच्या कडेला देशी दारूच्या बाटल्या बाळगताना आढळून आले. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सतीश शेवगण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 105/2026 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तिसऱ्या कारवाईत अजिंठा–बुलढाणा महामार्गावरील वाढोणा येथे अरुण सुखदेव गवळी (वय 19) हा हॉटेल सह्याद्री येथे पिशवीतून देशी दारू विक्री करताना आढळून आला. याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल सुनील जाधव यांच्या फिर्यादीवरून गुन्हा रजिस्टर क्रमांक 102/2025, कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही सर्व कारवाई जालना जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अपर पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन कटेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने यांच्या पथकाने केली आहे.
