Maharashtra

अपह्रत अल्पवयीन मुलीचा शोध लागला नाही तर रास्ता रोकोचा इशारा; कुटुंबीयांचे पोलिसांना निवेदन:-

अपह्रत अल्पवयीन मुलीचा शोध लागला नाही तर रास्ता रोकोचा इशारा; कुटुंबीयांचे पोलिसांना निवेदन:-

जि. नांदेड, ता. (माहूर):दि. 16 एप्रिल 2026:-
माहूर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीच्या अपहरण प्रकरणात अद्याप कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने संतप्त झालेल्या कुटुंबीयांनी १७ एप्रिल रोजी गोंडवडसा फाटा येथे रास्ता रोको आंदोलनाचा इशारा दिला आहे. याबाबत अपह्रत मुलीच्या आईने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ५ एप्रिल रोजी माहूर तालुक्यातील एका गावातून अज्ञात व्यक्तीने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याची तक्रार मुलीच्या आईने माहूर पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी एफआयआर क्र. ०६५/२०२६ नुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे. मात्र, घटनेनंतर अद्याप आरोपींचा शोध लागलेला नसल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

फिर्यादींच्या म्हणण्यानुसार, पोलिसांकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस कारवाई होत नसून उलट आरोपींना शोधून आणण्याचा सल्ला दिला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित संशयित व्यक्तीने यापूर्वीही मुलींचे अपहरण केल्याचे व धमक्या दिल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या पार्श्वभूमीवर, “अपह्रत मुलीचा तात्काळ शोध घेऊन अपहरणकर्त्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा १७ एप्रिल रोजी गोंडवडसा फाटा येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल,” असा इशारा कुटुंबीयांनी दिला आहे.

या आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते प्रफुल जाधव यांच्यासह नातेवाईक व स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सध्या या प्रकरणामुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून पोलिस प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button