शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल – श्री ईश्वर शिंदे सरांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2026’ जाहीर
शैक्षणिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल – श्री ईश्वर शिंदे सरांना ‘डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार 2026’ जाहीर

पारध / महेंद्र बेराड – ए. डी. फाउंडेशन यांच्या वतीने दरवर्षी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार सन 2026 साठी येथील सावंगी (अ.) तालुका भोकरदन जिल्हा जालना येथील शिक्षणतज्ज्ञ श्री ईश्वर शिंदे सर यांना जाहीर करण्यात आला आहे. त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उन्नतीसाठी केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत ही निवड करण्यात आली आहे.
श्री ईश्वर शिंदे सर हे श्री शिवेश्वर शैक्षणिक व क्रीडा संस्था संचलित महर्षी कै.भास्कररावजी शिंगणे विद्यालय, सावंगी चे संस्थापक अध्यक्ष व मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असून त्यांनी गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान दिले आहे. त्यांनी सुमारे 28 वर्षांपूर्वी संस्थेची स्थापना करून ग्रामीण भागात शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. विशेष म्हणजे, गेल्या 23 वर्षांपासून त्यांनी सातत्याने शाळा सुरू ठेवत अनेक विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याचे कार्य केले आहे.
आर्थिक अडचणी असूनही विनावेतन सेवा देत त्यांनी अनेक गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात नोकरी व व्यवसायात यशस्वी झाले आहेत. शिक्षणातील गुणवत्ता वाढवणे, विद्यार्थ्यांना स्पर्धात्मक बनवणे आणि ग्रामीण भागात शैक्षणिक जागरूकता निर्माण करणे यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले.
दरम्यान, या पुरस्काराचे वितरण दि. 11 एप्रिल 2026 रोजी आयोजित विशेष कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत स्वारगेट, पुणे येथे करण्यात येणार असून यावेळी श्री शिंदे सरांचा सन्मान करण्यात येणार आहे.
यापूर्वी त्यांना महाराणा प्रताप स्मारक समिती, भोकरदन यांच्या वतीने “शिक्षण महर्षी” पुरस्कार तसेच ग्रामपंचायत कार्यालय, सावंगी (अवघडराव) यांच्या वतीने “सावंगीरत्न” पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल परिसरातील सामाजिक, शैक्षणिक व राजकीय सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

