श्रीरामपूर RTO मध्ये कर्मचाऱ्याला मारहाण; दोघांवर गुन्हा.
श्रीरामपूर RTO मध्ये कर्मचाऱ्याला मारहाण; दोघांवर गुन्हा.

टाकळीभान प्रतिनिधी- श्रीरामपूर येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात कार्यरत असलेले वरिष्ठ लिपिक सुधाकर संपत साळवे (वय ५१) यांना कार्यालयीन वेळेत दोन जणांनी मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याची घटना घडली.
याप्रकरणी सुधाकर साळवे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, श्री.साळवे हे गुरुवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास नियमित कामकाज करत असताना, आरटीओ एजंट सुरेश ऊर्फ शाम गवारे रा. शिरसगाव, ता. श्रीरामपूर आणि सुजित गायकवाड रा. सरस्वती कॉलनी, श्रीरामपूर हे त्यांच्या टेबलजवळ आले. कोणतेही कारण नसताना त्यांनी साळवे यांच्याशी वाद घालत, अरेरावीची भाषा वापरली व धमकी देऊन तेथून निघून गेले. दुपारी सुमारे ४.१५ वाजता सुरेश गवारे याने पुन्हा कार्यालयात येऊन एका चारचाकी वाहनासाठी एलपीजी गॅस किट बसविण्याबाबत ना हरकत सही करण्याची मागणी केली. त्यावेळी साळवे यांनी संबंधित वाहनावर वित्तीय बोजा असल्याने फायनान्स कंपनीचा ना हरकत दाखला आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी अहवालावर तसा शेरा मारून सही केली. यामुळे संतप्त झालेल्या गवारे याने साळवे यांना शिवीगाळ करत कानाखाली मारहाण केली. तसेच संगणकाचा किबोर्ड हिसकावण्याचा प्रयत्न करत सरकारी कामात अडथळा निर्माण केला.
यानंतर साळवे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार देण्यासाठी जात असताना गवारेने त्यांच्या मागे येत शिवीगाळ केली. त्यावेळी कॅबिनसमोर उभ्या असलेल्या सुजित गायकवाड यानेही वादात सहभागी होत साळवे यांना धरून मारहाण केली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रतिनिधी : दिलीप लोखंडे श्रीरामपूर