Maharashtra

आरटीई २५% प्रवेशासाठी लॉटरी जाहीर;

आरटीई २५% प्रवेशासाठी लॉटरी जाहीर;

जि. नांदेड. ता. (बिलोली):दि. 10 एप्रिल 2026:
महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या आरटीई (Right to Education) २५ टक्के राखीव जागांच्या प्रवेशासाठीची बहुप्रतीक्षित संगणकीय लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. मात्र, विद्यार्थ्यांची निवड यादी १० एप्रिल २०२६ रोजी अधिकृतपणे जाहीर होणार असल्याने पालकांना निकालासाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, लॉटरी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अंतिम निकाल आणि निवड यादी पोर्टलवर १० एप्रिलपासून उपलब्ध होईल. त्याचबरोबर प्रतीक्षा यादी (Waiting List) देखील जाहीर करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांना १० एप्रिलपासून नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएसद्वारे माहिती मिळण्यास सुरुवात होईल. तरीही केवळ एसएमएसवर अवलंबून न राहता पालकांनी अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्जाची स्थिती तपासावी, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे.

पालकांसाठी महत्त्वाच्या सूचना :

१० एप्रिल रोजी निवड व प्रतीक्षा यादी पोर्टलवर प्रसिद्ध होईल.
लॉगिन करून ‘अलॉटमेंट लेटर’ डाउनलोड करणे आवश्यक आहे.
ठरवून दिलेल्या केंद्रावर जाऊन कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करावा.
प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक असलेली सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या छायांकित प्रती तयार ठेवाव्यात, जेणेकरून पडताळणी प्रक्रियेत विलंब होणार नाही, असेही शिक्षण विभागाने नमूद केले आहे.

अधिक माहितीसाठी पालकांनी RTE Maharashtra Admission Portal या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी.

पत्रकार : विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button