Maharashtra

मुंबईतील विधान भवन परिसरात महात्मा बसवेश्वर महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याच्या मागणीला जोर 

मुंबईतील विधान भवन परिसरात महात्मा बसवेश्वर महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याच्या मागणीला जोर

मुंबई :दि. 08 एप्रिल 2026:
जगातील पहिले लोकशाही तत्त्वांवर आधारित संसद मानल्या जाणाऱ्या ‘अनुभव मंटप’ची स्थापना १२व्या शतकात जगतज्योती महात्मा बसवेश्वर महाराज यांनी केली होती. त्यांच्या समतावादी, प्रगत आणि लोकाभिमुख विचारांचा प्रभाव आजही संपूर्ण देशात, विशेषतः महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर जाणवतो.

या पार्श्वभूमीवर मुंबईतील विधान भवन परिसरात महात्मा बसवेश्वर महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी आता जोर धरत आहे. सामाजिक कार्यकर्ते विवेक नागेश जिरनाळे यांनी याबाबत महाराष्ट्र विधान परिषद सभापती राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, विधान परिषद उपसभापती नीलम ताई गोरे तसेच राज्यातील सर्व मंत्र्यांना निवेदन सादर केले आहे.

या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ योग्य तो निर्णय घेण्याचे निर्देश देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या मागणीला लवकरच सकारात्मक प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

महात्मा बसवेश्वर महाराज यांनी समाजात समता, बंधुता आणि न्याय या मूल्यांची रुजवण केली. ‘अनुभव मंटप’च्या माध्यमातून त्यांनी सर्व समाजघटकांना विचार मांडण्याचे व्यासपीठ दिले, ज्यामुळे लोकशाहीची बीजे रोवली गेली.

जर विधान भवन परिसरात त्यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला, तर तो केवळ सन्मानच नव्हे, तर भावी पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. त्यांच्या कार्याची आणि विचारांची ओळख अधिक व्यापक पातळीवर होऊन समाजात सकारात्मक परिवर्तनाला चालना मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button