Maharashtra

जत-सांगोला महामार्गावर भीषण अपघात; विठ्ठलनगरजवळ २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

जत-सांगोला महामार्गावर भीषण अपघात; विठ्ठलनगरजवळ २५ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

जत (प्रतिनिधी) : सांगली जिल्ह्यातील जत-सांगोला महामार्गावर रविवारी पहाटेच्या सुमारास एक भीषण अपघात घडला.विठ्ठलनगर परिसरात एका अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने बापूसो (बापू) शिवाजी वाघमोडे (वय २५) या तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या घटनेमुळे संपूर्ण जत तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,बापूसो वाघमोडे हे रविवारी (५ एप्रिल) पहाटे ३:३० च्या सुमारास जत-सांगोला महामार्गावरील विठ्ठलनगर येथील ज्योतिर्लिंग गॅरेजच्या जवळून पायी जात होते. यावेळी महामार्गावरून सुसाट वेगाने येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांना पाठीमागून जोराची धडक दिली.धडक इतकी भीषण होती की, बापू वाघमोडे हे गंभीर जखमी होऊन रस्त्यावर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.धडक दिल्यानंतर संबंधित वाहन चालकाने मदतीसाठी न थांबता वाहन घेऊन घटनास्थळावरून पलायन केले.

पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर वर्दळ कमी होती,ज्याचा फायदा घेत अज्ञात वाहन चालक पसार झाला.पहाटे काही नागरिकांना रस्त्यावर मृतदेह दिसल्यानंतर त्यांनी तातडीने जत पोलिसांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच जत पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला.मृतदेह शवविच्छेदनासाठी जत ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला.याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे पोलीस फरार चालकाचा शोध घेत आहेत.बापू वाघमोडे हा तरुण मनमिळाऊ स्वभावाचा असल्याने त्याच्या निधनाने वाघमोडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून,परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

प्रतिनिधी : संजय कोळी.
७८७५९०३७७७.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button