Maharashtra

दिव्यांग निधी व निराधार योजनेचा रखडलेला लाभ तातडीने द्या; अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा:

दिव्यांग निधी व निराधार योजनेचा रखडलेला लाभ तातडीने द्या; अन्यथा अमरण उपोषणाचा इशारा:

जि. नांदेड. ता.(माहूर) :दि. 07 एप्रिल 2026;
ग्रामपंचायतींकडील ५ टक्के दिव्यांग निधी तसेच निराधार योजनेचे रखडलेले मानधन तातडीने वितरित करण्यात यावे, अन्यथा पंचायत समिती कार्यालयासमोर अमरण उपोषण छेडण्यात येईल, असा इशारा प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष किशोर हुडेकर यांनी दिला आहे.

यासंदर्भात तहसीलदार माहूर व गटविकास अधिकारी, पंचायत समिती माहूर यांना संघटनेच्या वतीने निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, गेल्या दोन ते तीन वर्षांपासून अनेक ग्रामपंचायतींनी दिव्यांगांसाठी राखीव असलेला ५ टक्के निधी अद्याप वितरित केलेला नाही. तसेच निराधार योजनेचे मानधनही मोठ्या प्रमाणात रखडलेले आहे.

दिव्यांग बांधव ग्रामपंचायतींकडे विचारणा करण्यासाठी गेल्यास त्यांना उडवाउडवीची व उध्दट वागणूक मिळत असल्याची तक्रारही यावेळी करण्यात आली. अनेक दिव्यांग नागरिकांकडे राहण्यासाठी जागा नसल्याने त्यांना किमान २०० चौरस फुट जागा उपलब्ध करून देण्यात यावी, तसेच घरकुल योजनेत दिव्यांगांना प्रथम प्राधान्य द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

याशिवाय ग्रामपंचायत ऑनलाईन प्रणालीत दिव्यांगांची नोंदणी करून सर्व लाभ पारदर्शक पद्धतीने देण्यात यावेत, अशीही मागणी करण्यात आली आहे. संबंधित मागण्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास संघटनेच्या माध्यमातून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निवेदनावर तालुकाध्यक्ष किशोर हुडेकर, तालुका सचिव गणेश आधव, शहर प्रमुख बळवंत नागरगोजे, बाबसिंग ठाकूर, प्रभाकर नेवारे, दिगंबर चुकानाकर, राजू कातले, निखिल ठाकरे आदी पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button