Maharashtra

छोटाहात्ती थेट ग्रामपंचायतीच्या विहिरीत; जीवितहानी टळली, ₹२० हजारांचे भरडधान्य नुकसान;

छोटाहात्ती थेट ग्रामपंचायतीच्या विहिरीत; जीवितहानी टळली, ₹२० हजारांचे भरडधान्य नुकसान;

स्मशानभूमी जवळील कठडे नसलेल्या विहिरींचा प्रश्न ऐरणीवर; दीड तासांच्या प्रयत्नानंतर वाहन बाहेर:

जि. छ. संभाजीनगर:ता. (सोयगाव);
दि. 06 एप्रिल 2026:
नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील घटनेची चर्चा सुरू असतानाच सोयगाव तालुक्यातील कंकराळा येथे रविवारी दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास विना चालक मालवाहू छोटाहात्ती वाहन थेट ग्रामपंचायतीच्या विहिरीत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी शेतकऱ्यांचे सुमारे वीस हजार रुपयांचे भरडधान्याचे नुकसान झाले आहे.

सोयगावपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर असलेल्या कंकराळा गावातील हर्षल राजपूत यांचे छोटाहात्ती मालवाहू वाहन (क्र. एमएच ०१ डीआर २८१०) हे गावातील अर्जुन राजपूत यांनी आपल्या मुलीच्या गावी भडगाव येथे नेण्यासाठी पाच क्विंटल गहू व चाळीस किलो तुर भरून उभे केले होते. वाहन चालक-मालक सोयगाव-चाळीसगाव रस्त्यावर वाहन उभे करून पाणी पिण्यासाठी घरी गेले असताना विना चालक वाहन अचानक स्मशानभूमी जवळील ग्रामपंचायत मालकीच्या विहिरीत कोसळल्याचे प्रत्यक्षदर्शी महिलांनी सांगितले.

घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली. वाहनात कोणी अडकले आहे का, या भीतीने ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. रस्त्याच्या कामावर असलेली क्रेन बोलावून दीड ते दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर विहिरीतून वाहन बाहेर काढण्यात आले. सुदैवाने वाहनात कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

या बचावकार्यात जीवन उबाळे या युवकाने धाडस दाखवत विहिरीत उतरून वाहनाच्या चेसिसला पट्टा अडकवला. त्यानंतर मोतीलाल घुसिंगे, बाळू पाटील, शिवसेना (उबाठा) तालुकाप्रमुख दिलीप मचे, उपतालुकाप्रमुख सूर्यभान गवळी, गणेश मचे, बबलू राजपूत यांच्यासह ग्रामस्थांनी वाहन बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.

दरम्यान, ग्रामपंचायतीला २०२०-२१ मध्ये विहीर खोदण्याची परवानगी मिळाली होती. २०२३-२४ मध्ये स्मशानभूमी जवळ विहीर खोदण्यात आली असून ती सुमारे ५० फूट खोल आहे. सध्या विहिरीत ४० ते ४५ फूट पाणी असल्याचे नागरिकांनी सांगितले. मात्र विहिरीला कठडे नसल्याने भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी सुरक्षेची उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.

घटनेची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी संजय सिघल यांनी घटनास्थळी धाव घेतली. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

पत्रकार :विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button