पावसाळ्यापूर्वी शेत रस्ते व पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करा — महेंद्र बेराड यांची प्रशासनाकडे मागणी

पावसाळ्यापूर्वी शेत रस्ते व पाणंद रस्त्यांची कामे पूर्ण करा — महेंद्र बेराड यांची प्रशासनाकडे मागणी
पारध (प्रतिनिधी) : पारध–पिंपळगाव रेणुकाई सर्कलमधील शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या पाणंद रस्ते व शेत रस्त्यांच्या समस्येबाबत आज पिंपळगाव रेणुकाई येथे आवाज उठवण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व महसूल अभियानाच्या पार्श्वभूमीवर नायब तहसीलदार यांना निवेदन देत, पावसाळ्यापूर्वी सर्व रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी करण्यात आली.
सध्या सर्कलमधील अनेक शेत रस्ते व पाणंद मार्ग अत्यंत खराब अवस्थेत आहेत. काही ठिकाणी रस्ते अस्तित्वातच नसल्याने शेतकऱ्यांना शेतात जाणे-येणे कठीण झाले आहे. शेतीमाल बाजारात नेण्यासाठीही मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. विशेषतः पावसाळ्याच्या काळात ही परिस्थिती अधिक गंभीर बनते. चिखल, पाण्याचे साचलेले खड्डे आणि रस्त्यांचा अभाव यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून दैनंदिन कामांवरही परिणाम होत आहे.
यामुळे प्रशासनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन पावसाळ्यापूर्वी पाणंद रस्ते व शेत रस्त्यांची दुरुस्ती व नवीन रस्त्यांची निर्मिती करावी, अशी ठाम मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. तसेच संबंधित विभागाने प्रत्यक्ष पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर मार्गी लावावीत, असेही नमूद करण्यात आले.
या निवेदनावेळी पारध येथील सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी श्री महेंद्र बेराड सर, कोसगाव येथील दैनिक लढणारा कलमवीरचे पत्रकार सुनील उंबरकर, पिंपळगाव रेणुकाई येथील पत्रकार गणेश सास्ते, वालसावंगी येथील दैनिक पोलीस न्यूजचे पत्रकार हरिदास गवळी तसेच पारध येथील सामाजिक कार्यकर्ते गणेश तेलंग्रे यांची उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत प्रशासनाने संवेदनशीलता दाखवून तात्काळ उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
दरम्यान, शेतकऱ्यांच्या या मागण्यांकडे प्रशासन कितपत गांभीर्याने पाहते आणि प्रत्यक्षात कामांना गती मिळते का, याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.