राघव चड्ढा यांना AAP कडून राज्यसभा उपनेतेपदावरून हटवले; सोशल मीडियावर जनतेचा मोठा
राघव चड्ढा यांना AAP कडून राज्यसभा उपनेतेपदावरून हटवले; सोशल मीडियावर जनतेचा मोठा पाठिंबा
नवी दिल्ली, ४ एप्रिल २०२६:
राघव चड्ढा यांना आम आदमी पार्टी (AAP) कडून राज्यसभा उपनेतेपदावरून हटवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. पक्षाने सभापतींना पत्र पाठवून त्यांना बोलण्याचा वेळ देऊ नये, अशी विनंती केल्याचेही समजते.
विश्वासार्ह सूत्रांच्या माहितीनुसार, चड्ढा यांनी अलीकडे टेलिकॉम कंपन्यांविरोधात घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे ही कारवाई झाल्याची चर्चा आहे. त्यांनी टॅरिफ वाढ, ग्राहकांचे शोषण आणि मोठ्या कंपन्यांच्या एकाधिकारवादी धोरणांवरून संसदेत तसेच सोशल मीडियावर टीका केली होती. त्यांनी केंद्र सरकारलाही या मुद्द्यावर धारेवर धरले होते.
चड्ढा यांच्या स्वतंत्र भूमिकेमुळे पक्षात मतभेद अधिक तीव्र झाल्याचे बोलले जात आहे.
AAP ने या निर्णयाला “प्रशासकीय पुनर्रचना” असे संबोधले असले, तरी राजकीय विश्लेषक यामागे टेलिकॉम लॉबीचा प्रभाव असू शकतो, असा अंदाज व्यक्त करत आहेत.
सोशल मीडियावर जनतेचा पाठिंबा
दरम्यान, या कारवाईनंतर चड्ढा यांना सोशल मीडियावर मोठा जनसमर्थन मिळताना दिसत आहे. ट्विटर (X), फेसबुक आणि इतर प्लॅटफॉर्मवर #StandWithRaghavChadha, #SupportChadha असे हॅशटॅग ट्रेंड होत आहेत.
अनेक युजर्सनी वाढत्या टॅरिफ आणि ग्राहकांच्या समस्यांवर आवाज उठवल्याबद्दल चड्ढा यांचे कौतुक केले आहे. काहींनी त्यांना “जनतेचा खरा प्रतिनिधी” असे संबोधले आहे, तर काहींनी AAP च्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
काही सोशल मीडिया युजर्सनी पक्षावर कॉर्पोरेट दबावाखाली काम केल्याचा आरोपही केला आहे. यामुळे या प्रकरणाने राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
दरम्यान, राघव चड्ढा यांनी या घडामोडींवर अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, त्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, या प्रकरणामुळे AAP च्या एकजुटीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे
