ग्राम रोजगार सहाय्यकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू

ग्राम रोजगार सहाय्यकांचे बेमुदत कामबंद आंदोलन सुरू
भोकरदन : राज्यातील ग्राम रोजगार सहाय्यकांच्या रखडलेल्या मागण्यांकडे राज्य शासन गेल्या तब्बल अठरा महिन्यांपासून जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेने कालपासून (दि.१) बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले आहे.
या पार्श्वभूमीवर भोकरदन तालुक्यातील ग्राम रोजगार सहाय्यक बंधूंनी कामबंदचा इशारा देत गटविकास अधिकारी श्री. श्रीकृष्ण वेणेकर यांना निवेदन सादर केले. याबाबतची माहिती संघटनेचे अध्यक्ष श्री. संतोष पाखरे यांनी दिली.
सदर निवेदनात ग्राम रोजगार सहाय्यकांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत सरकारने तातडीने निर्णय घेऊन प्रश्न मार्गी लावावेत, अशी मागणी करण्यात आली आहे. गेल्या अठरा महिन्यांपासून सरकारने अध्यादेश काढूनही ग्राम रोजगार सेवकांना कोणताही प्रत्यक्ष फायदा झाला नसल्याने ग्राम रोजगार सहाय्यकांनी निषेध म्हणून हे कामबंद आंदोलन सुरू केल्याचे सांगण्यात आले.
या आंदोलनावेळी संघटनेचे अध्यक्ष श्री. संतोष पाखरे, उपाध्यक्ष केशव नवल, विशाल राऊत, समाधान मिसाळ, कृष्णा, रविंद्र सावंत, वनारसे, बि. यु. भजंग, इरफान सत्तार शेख, राजेंद्र जोगदंडे, राजू सहाशे, विजय मगरे, खंडू जाधव, गजानन शेळके, चांगदेव बावस्कर, बद्री मिसाळ यांसह अनेक ग्राम रोजगार सहाय्यक उपस्थित होते.
प्रतिनिधी महेंद्र बेराड
