Maharashtra

गुन्हेगारीमुक्त समाजासाठी पोलीस आणि जनता यांच्यातील ‘संवाद’ हाच दुवा-पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे.

गुन्हेगारीमुक्त समाजासाठी पोलीस आणि जनता यांच्यातील ‘संवाद’ हाच दुवा-पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,

टाकळीभान प्रतिनिधी : समाज कंटकांना कायद्याचे भय असलेच पाहिजे, मात्र सर्वसामान्य नागरिकाला पोलिसांकडे येताना सुरक्षित आणि आश्वस्त वाटले पाहिजे. गुन्हेगारीमुक्त आणि शांतताप्रिय समाजासाठी पोलीस आणि जनता यांच्यातील ‘संवाद’ हाच सर्वात मोठा दुवा आहे, पोलीस प्रशासनाने केवळ कारवाई करून चालणार नाही, तर जनतेच्या मनात सुरक्षिततेची भावना निर्माण करणे महत्त्वाचे आहे. गुन्हेगारांवर कायद्याचा वचक हवा, मात्र सर्वसामान्य नागरिकाला पोलीस ठाण्यात येताना भीती वाटू नये, तर आपला हक्काचा माणूस भेटल्याचे समाधान मिळावे, असे प्रतिपादन अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी केले.

श्रीरामपूर येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, पोलीस उपाधीक्षक जयदत्त भवर, श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, पोलीस निरीक्षक अरुण धनवटे आणि मुख्याधिकारी मच्छिद्र घोलप उपस्थित होते. यावेळी शहरातील उपस्थित विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठीत नागरिक, व्यावसायिक यांनी शहराच्या कायदा व सुव्यवस्थेबाबत आपले विचार मांडले.

यावेळी श्रीरामपूर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरुद्ध उघडलेल्या मोहिमेबाबत अधिक्षक घार्गे यांनी माहिती दिली. अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या नेतृत्त्वाखाली शहरात नवीन भारतीय न्याय संहिता कायद्याचा प्रभावी वापर सुरू केला आहे. यात प्रामुख्याने वारंवार गुन्हे करणाऱ्या आणि जामिनावर बाहेर येऊन पुन्हा शांतता भंग करणाऱ्या २५ ते ३० सराईत गुन्हेगारांवर पुन्हा कारवाई करण्यात आली आहे. शहरातील दहशत मोडित काढण्यासाठी पोलिसांनी गेल्या काही दिवसांत ७ ते ८ अवैध घातक शखाखांची जप्ती केली आहे. ही कारवाई केवळ जिल्ह्यासाठीच नव्हे, तर राज्यासाठी एक पथदर्शक पाऊल मानले जात असल्याचे घार्गे म्हणाले. व्यापाऱ्यांच्या संरक्षणासाठी

पोलीस चोवीस तास तत्पर राहतील. श्रीरामपूरचे व्यावसायिक वैभव टिकवण्यासाठी पोलीस गस्त वाढवली जाईल आणि सीसीटीव्ही यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.

या संवादा दरम्यान नागरिकांनी काही समस्या मांडल्या. त्यात शहरात रामनवमी उत्सवादरम्यान झेंडा मिरणुकीवेळी दगडफेक झाल्यानंतर शहरात तणावाचे वातावरण झाले. या चुकीच्या घटनांचा सर्वांनीच यावेळी निषेध करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी जीवन सुरूडे, लकी सेठी, किशन ताके, बाबा शिंदे, अशोक बागुल, रितेश एडके आदींनी केली. या सर्व घटनांची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांनी केली. पुणतांब्याहून यात्रेसाठी कावडीने पाणी आणले जाते त्यांना संरक्षण देण्याची मागणी अशोक थोरे यांनी केली.

पोलिसांनी सामान्य नागरिकांशी वेळोवेळी संवाद साधला पाहिजे. नागरिकांशी संवाद राहिल्यामुळे अनेक घटनांचे संकेत पोलिसांना वेळेत मिळू शकतात. अनेकदा समाजात घडणाऱ्या गोष्टींची माहिती पोलिसांना उशिरा मिळते. जर स्थानिक नागरिकांशी चांगले संबंध असतील, तर ही माहिती त्वरित मिळून अनुचित प्रकार टाळता येतात असेही घार्गे यांनी यावेळी सहकाऱ्यांना सूचीत केले.

प्रतिनिधी: दिलीप लोखंडे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button