बाल संगोपन योजनेसाठी १८१ कोटी रुपयांचा निधी.
टाकळीभान(प्रतिनिधी)-महिला व बालविकास विभागांतर्गत सुवर्ण महोत्सवी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेच्या दीड लाख लाभार्थी बालकांच्या खात्यात वर्षभरापासून असलेला खडखडाट संपणार आहे. नवीन आर्थिक वर्षात १८१ कोटी रुपयांच्या निधीतून आता पैशांचा खळखळाट होणार आहे.
फेब्रुवारीत ६० कोटी आणि मार्च अखेरीस ११५ कोटी रुपये, तसेच केंद्र पुरस्कृत प्रायोजित योजनेचे ६ कोटी ६६ लाख ६७ हजार असा एकूण १८१ कोटी ६६ लाख ६७ हजार रुपयांचा निधी आयुक्तालयास प्राप्त झाला आहे. यामुळे लाभार्थ्यांना एप्रिलमध्ये दिलासा मिळणार आहे. मात्र, यापूर्वीचा लाभ प्रलंबित असल्याने सन २०२५-२६ साठी हा निधीअपुरा ठरण्याची शक्यता आहे. सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात वर्षभरापासून लाभार्थ्यांच्या बँक खात्यात निधी जमा न झाल्याने खडखडाट होता.
त्यामुळे साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, राज्य समन्वयक व मिशन वात्सल्य शासकीय समितीचे सदस्य मिलिंदकुमार साळवे यांच्यासह समितीच्या राज्यभरातील विविध समन्वयक आणि कार्यकर्त्यांनी आपापल्या पातळीवर प्रयत्न केले होते. साळवे व कुलकर्णी यांनी सातत्याने मंत्रालय तसेच महिला व बालविकास आयुक्तालयाच्या पातळीवर पाठपुरावा सुरू ठेवला होता. दीड ते दोन वर्षांपासून लाभार्थ्यांना योजनेचा लाभमिळालेला नव्हता.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार, विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोहे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, मुख्यमंत्री सचिवालयाचे अश्विनी भिडे, श्रीकर परदेशी, अतुल वझे, प्रिया खान व यांच्यासह महिला बालविकास आयुक्त नयना गुंडे, विशेष कार्य अधिकारी राजेश गायकवाड, कक्ष अधिकारी डॉ. निलेश पाटील यांच्याकडेही सतत पाठपुरावा केला होता. साळवे यांनी नुकतेच आयुक्तालयात अधिकाऱ्यांची भेट घेतली. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व इतरांकडे थकीत प्रलंबित अनुदान तात्काळ देण्याची मागणी केली होती. या सर्व पाठपुराव्यास आता यश आले आहे.
प्रतिनिधी : दिलीप लोखंडे श्रीरामपूर