Maharashtra

डिलिव्हरी बॉयच्या उत्पन्नावर गदा; व्यावसायिक गॅसटंचाईमुळे हॉटेल्स, क्लाऊड किचन बंद;

डिलिव्हरी बॉयच्या उत्पन्नावर गदा; व्यावसायिक गॅसटंचाईमुळे हॉटेल्स, क्लाऊड किचन बंद;

पुणे, दि. 30/06/26;
शहरात गेल्या काही दिवसांपासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा विस्कळीत झाल्याने त्याचे पडसाद आता फूड डिलिव्हरी क्षेत्रावर उमटू लागले आहेत. गॅसअभावी अनेक लहान-मोठी हॉटेल्स तसेच क्लाऊड किचन तात्पुरती बंद ठेवावी लागली आहेत. परिणामी, ऑनलाइन फूड ऑर्डरमध्ये लक्षणीय घट झाली असून स्विगी आणि झोमॅटो सारख्या प्लॅटफॉर्मवरील व्यवहार मंदावले आहेत.

ऑर्डरची संख्या घटल्याने डिलिव्हरी पार्टनर्सच्या कामावर थेट परिणाम झाला आहे. रोजच्या कमाईवर अवलंबून असलेल्या या कामगारांसाठी ही परिस्थिती चिंताजनक ठरत आहे. अनेकांना दिवसाकाठी मिळणाऱ्या डिलिव्हरी कमी झाल्याने उत्पन्न घटले असून काहींना पूर्ण वेळ काम मिळणेही कठीण झाले आहे. त्यामुळे काही डिलिव्हरी बॉईजने पर्यायी रोजगार शोधण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, अनेक डिलिव्हरी पार्टनर्सना कर्जावर घेतलेल्या दुचाकींचे हप्ते भरणे अवघड झाले आहे. इंधन खर्च, देखभाल आणि घरखर्च या सर्वांचा ताळमेळ घालताना त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. परिस्थिती लवकर सुधारली नाही, तर या क्षेत्रातील कामगारांचे प्रश्न अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

शहरातील अनेक हॉटेल आणि क्लाऊड किचनमध्ये गॅसचा नियमित पुरवठा खंडित झाल्याने स्वयंपाकाची कामे सुरळीत पार पाडणे अशक्य होत आहे. परिणामी, काही व्यावसायिकांनी तात्पुरते शटर खाली ओढले असून काही ठिकाणी मर्यादित मेनूवर काम सुरू ठेवले आहे. या परिस्थितीमुळे खाद्यव्यवसायाची गती मंदावली असून ऑनलाइन ऑर्डरमध्ये घट झाली आहे.

गिग अर्थव्यवस्थेतील कामगारांना अशा संकटांचा सर्वाधिक फटका बसतो. नियमित पगार किंवा सामाजिक सुरक्षा नसल्यामुळे त्यांच्या उत्पन्नात होणारी घट थेट त्यांच्या जीवनमानावर परिणाम करते. त्यामुळे अशा परिस्थितीत सरकार आणि संबंधित कंपन्यांनी काही तात्पुरत्या सवलती किंवा साहाय्य योजना जाहीर करण्याची गरज आहे, असे मत कामगार क्षेत्रातील तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

पूर्वी दिवसाला १५-२० ऑर्डर मिळायच्या, आता त्या निम्म्याहून कमी झाल्या आहेत. पेट्रोल खर्च काढणेही कठीण होत आहे. दुचाकीचा हप्ता आणि घरखर्च कसा भागवायचा, हा मोठा प्रश्न आहे. गेल्या १५ दिवसांपासून हिच परिस्थिती असून ती कधी सुधारेल याबाबत काहीच निश्चिती नाही.
पत्रकार : विजय रणभोर, पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button