दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा इशारा; UDID-आधार लिंक न केल्यास अनुदान बंद होणार
दिव्यांग लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा इशारा; UDID-आधार लिंक न केल्यास अनुदान बंद होणार
सेलू (जि. यवतमाळ), दि. ३० मार्च : दिव्यांग कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने महत्त्वाची सूचना जारी केली आहे. युडीआयडी (UDID) कार्ड आधारशी लिंक करणे बंधनकारक करण्यात आले असून, ही प्रक्रिया वेळेत पूर्ण न केल्यास लाभार्थ्यांचे अनुदान बंद करण्यात येणार असल्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे.
जिल्ह्यात सुमारे २० हजारांहून अधिक दिव्यांग लाभार्थी असून, त्यापैकी जवळपास १३ हजार ४८४ लाभार्थ्यांकडे युडीआयडी कार्ड नाही किंवा ते आधारशी लिंक केलेले नाही. त्यामुळे सर्व लाभार्थ्यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत युडीआयडी कार्ड तयार करून ते आधारशी लिंक करणे तसेच संबंधित शासकीय कार्यालयात नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे. ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास दरमहा मिळणारे सुमारे अडीच हजार रुपयांचे अनुदान थांबवले जाऊ शकते, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या निर्देशानुसार यापूर्वी ३ डिसेंबर २०२५ ते २१ जानेवारी २०२६ या कालावधीत UDID-आधार लिंकिंगसाठी सूचना देण्यात आल्या होत्या, मात्र अनेक लाभार्थ्यांनी अद्याप ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. त्यामुळे प्रशासनाने आता कडक भूमिका घेत अलर्ट मोडवर काम सुरू केले आहे. नियमांनुसार आवश्यक कागदपत्रे पूर्ण न करणाऱ्या लाभार्थ्यांवर कारवाई केली जाणार असून, अपूर्ण नोंदणी किंवा चुकीची माहिती आढळल्यास अनुदान तात्काळ बंद करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनांचा लाभ घेण्यासाठी युडीआयडी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे कोणत्याही अडचणी टाळण्यासाठी सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी तातडीने संबंधित कार्यालयात जाऊन आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन दिव्यांग कल्याण विभागाने केले आहे.
पत्रकार : विजय रणभोर

