Maharashtra

सोसायटीत बनावट सरकारी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

सोसायटीत बनावट सरकारी अधिकाऱ्यांचा सुळसुळाट; नागरिकांना सतर्कतेचे आवाहन

 

पिंपरी-चिंचवड (प्रतिनिधी):
शहरातील विविध सोसायट्यांमध्ये बनावट सरकारी अधिकारी बनून घरांमध्ये प्रवेश करण्याचा प्रकार वाढत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. याबाबत “केंद्र सरकार सेवा सहकारी गृहनिर्माण संस्था” यांच्या वतीने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करणारी सूचना जारी करण्यात आली आहे.
सूचनेनुसार, काही भामटे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून घराघरांत जात आहेत. ते स्वतःला गृह मंत्रालयाशी संबंधित अधिकारी असल्याचे सांगत, बनावट ओळखपत्रे व लेटरहेड दाखवून विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न करतात. तसेच “भारत सरकारच्या आयुष्मान योजनेचे काम आहे” असे सांगून नागरिकांची वैयक्तिक माहिती व फोटो गोळा करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही समोर आले आहे.
या माध्यमातून नागरिकांची संवेदनशील माहिती मिळवून फसवणूक करण्याचा धोका असल्याने कोणतीही माहिती अशा व्यक्तींना देऊ नये, असे स्पष्टपणे सांगण्यात आले आहे. सोसायटीतील रहिवाशांनी, कुटुंबीयांनी आणि विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अधिक सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, कोणतीही संशयास्पद व्यक्ती घरात आल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, तसेच अशा प्रकारची माहिती इतरांनाही शेअर करून जागरूकता वाढवावी, असेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

प्रतिनिधी उमेश कुलकर्णी पुणे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button