भारतामध्ये इच्छामरण स्वीकारणारे पहिले व्यक्ती हरिश राणा यांचे निधन

भारतामध्ये इच्छामरण स्वीकारणारे पहिले व्यक्ती हरिश राणा यांचे निधन
नवी दिल्ली : भारतात निष्क्रिय इच्छामरण (Passive Euthanasia) मंजूर झाल्यानंतर त्याचा लाभ घेणारे पहिले व्यक्ती हरिश राणा यांचे मंगळवारी दिल्लीतील खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या निधनाने इच्छामरणाच्या चर्चेला पुन्हा एकदा वेग आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हरिश राणा गेल्या १३ वर्षांपासून कोमात होते. २०१३ साली पंजाब विद्यापीठ येथे सिव्हिल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना ते चौथ्या मजल्यावरील बाल्कनीतून पडले होते. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि तेव्हापासून ते कोमात होते.
दीर्घकाळ चाललेल्या उपचारांनंतरही प्रकृतीत सुधारणा न झाल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी न्यायालयात इच्छामरणासाठी अर्ज केला होता. त्यानंतर सर्वोच्च न्यायालय यांनी ‘मरणाचा अधिकार’ मान्य करत त्यांना निष्क्रिय इच्छामरणाची परवानगी दिली होती.
दरम्यान, या घटनेमुळे देशभरात इच्छामरण, मानवी अधिकार आणि वैद्यकीय नैतिकतेबाबत चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी या निर्णयाचे समर्थन केले असून, काहींनी त्यावर नैतिक प्रश्न उपस्थित केले आहेत.
हरिश राणा यांच्या निधनाने त्यांच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, समाजातही हळहळ व्यक्त केली जात आहे.
प्रतिनिधी उमेश कुलकर्णी