Maharashtra

लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र महिलांसाठी अमरावतीत महिला मोर्चा; शासनाविरोधात आक्रोश;

लाडकी बहीण’ योजनेतील अपात्र महिलांसाठी अमरावतीत महिला मोर्चा; शासनाविरोधात आक्रोश;

अमरावती (प्रतिनिधी): राष्ट्रीय प्रधान मुखिया सरपंच संघटना यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘मुख्यमंत्री सावत्र बहीण’ या नावाने भव्य महिला मोर्चा काढण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना मधील त्रुटींविरोधात हा मोर्चा काढण्यात आला.
या योजनेअंतर्गत ३१ डिसेंबरपर्यंत KYC अनिवार्य करण्यात आले होते. मात्र नेटवर्क समस्या, OTP अडचणी व तांत्रिक कारणांमुळे अनेक महिलांना KYC पूर्ण करता आले नाही. परिणामी, ३१ मार्चच्या सुधारित यादीतून अनेक गरजू महिलांना वगळण्यात आल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला.
मोर्चात सहभागी महिलांनी असा आरोप केला की, शासनाच्या निकषांमुळे प्रत्यक्ष गरजू महिलांना वंचित ठेवले जात आहे. काही ठिकाणी अल्पभूधारक शेतकऱ्यांऐवजी मोठ्या शेतकऱ्यांच्या पत्नींना लाभ मिळत आहे, तर दुसरीकडे तीनचाकी किंवा चारचाकी वाहन चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या भूमिहीन कुटुंबांच्या महिलांना अपात्र ठरवण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर, वंचित महिलांची नव्याने KYC करून त्यांना योजनेचा लाभ देण्यात यावा, तसेच तालुकास्तरावर समिती गठित करून घराघरांत जाऊन सर्वेक्षण करण्यात यावे, अशा प्रमुख मागण्या मोर्चाद्वारे मांडण्यात आल्या.

मोर्चादरम्यान जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अतुल भडांगे यांनी हा विषय गांभीर्याने घेत संबंधित मंत्रालयाला पत्राद्वारे कळविण्याचे आश्वासन दिले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीनेही समस्येचे समाधान करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे सांगण्यात आले.

दरम्यान, मागण्या मान्य न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल तसेच पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या मोर्चात मंगेश कांबळे (सरपंच, खेड पिंपरी) यांच्यासह शारदा कोडापे, उद्धव पारवे, जयश्री विटकरे, सलीमा शेख, कल्पना करपती, प्रभा लसंते, रेखा ठाकरे, वनिता रेहपाडे, मंगला कांबळे, संगीता खंडारे आदींसह मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या.
शासनाच्या धोरणांमुळे अपात्र ठरलेल्या महिलांचा हा आक्रोश असून, न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे.
पत्रकार विजय रणभोर.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button