छत्रपती संभाजीनगर: शाळेच्या प्रवेशद्वारावर दुर्गंधी; घाटनांद्र्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ, उपाययोजनेची मागणी
छत्रपती संभाजीनगर: शाळेच्या प्रवेशद्वारावर दुर्गंधी; घाटनांद्र्यात विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ, उपाययोजनेची मागणी
घाटनांद्रा (प्रतिनिधी): एकीकडे शाळेच्या भिंतीवर ‘शिक्षणापासून दूर करू नका’ असा उदात्त संदेश दिला जात असताना, दुसरीकडे प्रत्यक्षात शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावरच सांडपाणी साचल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. घाटनांद्रा येथील छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेसमोर गटारीचे पाणी तुंबल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
या शाळेत इयत्ता पहिली ते चौथीपर्यंत शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. ‘स्वच्छ शाळा, सुंदर शाळा’ हा नारा देत विद्यार्थ्यांना शिक्षणाकडे आकर्षित केले जात असले, तरी गेल्या काही दिवसांपासून गावातील सांडपाणी थेट शाळेच्या प्रवेशद्वारासमोर साचत असल्याने परिसरात अस्वच्छतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विद्यार्थ्यांना याच दूषित पाण्यातून वाट काढत शाळेत जावे लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून, सर्दी, ताप तसेच मलेरियासारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. सध्या गावात भूमिगत गटार योजनेचे काम सुरू असतानाही शाळेसमोरील या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भारत शिंदे, शिवनाथ बावस्कर, नाना मोरे, गोपाल गवरे, युवराज मोरे, संजय सुलताने यांच्यासह पालकांनी तातडीने साचलेले पाणी काढून कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.
प्रभाकर धुड, ग्रामविकास अधिकारी म्हणाले, “सांडपाण्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत येताना मोठ्या अडचणी येत आहेत. दुर्गंधी आणि डासांमुळे मुले आजारी पडण्याची भीती आहे. प्रशासनाने यावर कायमस्वरूपी तोडगा काढणे गरजेचे आहे.”
तसेच फिरोज सय्यद, मुख्याध्यापक यांनीही प्रशासनाने त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त केली.
— पत्रकार विजय रणभोर

