नाशिक प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; निष्पक्ष चौकशीसाठी मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची मागणी
नाशिक प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले; निष्पक्ष चौकशीसाठी मंत्रिमंडळ बरखास्त करण्याची मागणी
भोकरदन, दि. २२ मार्च २०२६
नाशिक येथील अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र मंत्रिमंडळ बरखास्त करावे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हा सचिव बोरशे गुरुजी यांनी केली आहे.
या प्रकरणामुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्ष दोन्हींकडून समाधानकारक भूमिका दिसून येत नसल्याची टीका त्यांनी केली. गंभीर आरोप समोर येऊनही अनेक नेते मौन बाळगत असल्याने जनतेत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे, असे ते म्हणाले.
भोंदू बाबांच्या नावाखाली राज्यात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात असल्याचा आरोप करत, काही राजकीय नेत्यांचे संबंधित व्यक्तीसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने या प्रकरणाची निष्पक्षता संशयास्पद ठरत असल्याचे त्यांनी नमूद केले. त्यामुळे या प्रकरणात संबंधित सर्व व्यक्तींची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित करत, केवळ एका व्यक्तीपुरती चौकशी मर्यादित न ठेवता सर्व संबंधितांवर कारवाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली.
राज्यात अंधश्रद्धा निर्मूलन कायदा अस्तित्वात असतानाही अशा घटना घडत असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने स्थापन केलेली SIT केवळ औपचारिकता ठरत असल्याचा आरोप करत, स्वतंत्र यंत्रणेमार्फत चौकशी व्हावी, असे ते म्हणाले.
सध्याच्या सरकारच्या काळात निष्पक्ष चौकशी होणे कठीण असल्याने मंत्रिमंडळ बरखास्त करूनच सत्य बाहेर येऊ शकते, असा दावा करत त्यांनी जनतेचा सरकारवरील विश्वास कमी होत असल्याचेही सांगितले.
प्रतिनिधी महेंद्र बेराड

