Maharashtra

आनवा सर्कलमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा; पंचनामे करून तात्काळ मदतीची मागणी – सौ. आनिताताई बोरशे

आनवा सर्कलमध्ये अवकाळी पाऊस व गारपीटीचा तडाखा; पंचनामे करून तात्काळ मदतीची मागणी – सौ. आनिताताई बोरशे
दिनांक 20 मार्च 2026
भोकरदन तालुक्यातील आनवा सर्कलमध्ये मुर्तड, वरुड, देहेड, मोहोळाई, कोसगाव, करजगाव, आनवा, आनवा पाडा, जानेफळ, कारला आदी गावांमध्ये गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसासह काही ठिकाणी गारपीट झाली. या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
विशेषतः उशिरा रब्बी पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची पिके काढणीच्या टप्प्यात असताना या वादळी पावसाने त्यांना फटका बसला. बियाण्याचा कांदा, काढणीस आलेला गहू, हरभरा तसेच इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी हतबल झाले असून त्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत.
या पार्श्वभूमीवर करजगाव येथील सौ. आनिताताई बोरशे यांनी प्रशासनाकडे तात्काळ नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली आहे. तसेच हे पंचनामे शासन दरबारी सादर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. नुकसान भरपाई मिळाल्यास शेतकऱ्यांना दिलासा मिळेल तसेच पुढील हंगामासाठी शेती खर्चाची सोय होईल, असेही त्यांनी नमूद केले.
अवकाळी पाऊस ही वारंवार घडणारी बाब असल्याने प्रत्येक वेळी पंचनामे व मदतीसाठी मागणी करण्याची वेळ येऊ नये. यासाठी शासनाने ठोस धोरण आखून वेळोवेळी शेतकऱ्यांना मदत करावी, अशी अपेक्षा देखील व्यक्त करण्यात आली आहे.

महेंद्र बेराड

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button