राजकीय दबाव झुगारून द्या; बनगाव अतिक्रमणमुक्त करा – बचाव समितीचा इशारा..
राजकीय दबाव झुगारून द्या; बनगाव अतिक्रमणमुक्त करा – बचाव समितीचा इशारा..
शासकीय जागांवर बेकायदेशीर बांधकामांचा सुळसुळाट; नागरिक त्रस्त, कारवाईची मागणी तीव्र…
आमगाव नगर परिषद हद्दीतील बनगाव परिसर सध्या अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला असून, शासकीय जागांवर बेकायदेशीर बांधकामांचा अक्षरशः सुळसुळाट झाल्याचे चित्र समोर आले आहे. “कोणीही या आणि जागा बळकवा” अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
बनगाव येथील कृषी उत्पन्न बाजार समिती परिसर, बैल बाजार, देशी दारू व बार दुकान परिसर तसेच मुख्य बाजाराकडे जाणाऱ्या मार्गांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे. काहीअतिक्रमणधारकांनी तर शासकीय जागेवर पक्के टीनशेड उभारून जागा कायमस्वरूपी बळकावली आहे.धक्कादायक बाब म्हणजे, या अतिक्रमणामागे सत्ताधारी पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांचा सहभाग असल्याची चर्चा रंगत आहे. त्यामुळेच नगर परिषद प्रशासनावर राजकीय दबाव येत असल्याने कारवाई लांबणीवर पडत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
वाढत्या अतिक्रमणामुळे रस्ते अरुंद झाले असून वाहतुकीची कोंडी दिवसेंदिवस वाढत आहे. वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर बनगाव बचाव समितीने तीव्र नाराजी व्यक्त करत नगर परिषद प्रशासनाला स्पष्ट इशारा दिला आहे की, कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता तात्काळ अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबवावी.
समितीने मुख्य मागण्या
शासकीय जागेवरील सर्व अतिक्रमण तात्काळ हटवावे
अतिक्रमणधारकांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत
बुलडोझर कारवाई करून जागा मोकळी कराव
भविष्यात अतिक्रमण होऊ नये यासाठी कठोर उपाययोजना करावी
“जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही, तर नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल असा असा इशारा समितीने दिला आहे
नगर परिषद प्रशासनाकडून लवकरच कारवाई होणार असल्याची माहिती असली, तरी प्रत्यक्षात बुलडोझर कधी चालणार याकडे संपूर्ण बनगाववासियांचे लक्ष लागले आहे.
पत्रकार विजय रणभोर.